महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेकडून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतींचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ‘पूर्व परीक्षा २०२०’ ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी तीन महिन्यांसाठी २४ हजार रुपये किंवा एकरकमी १५ हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे म्हणाले, ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी दर वर्षी सुमारे ५०० रिक्त जागा होतात. या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवून ऑनलाइन मोफत प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.’
‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची निवड केली जाते. या परीक्षा दर वर्षी आयोजित केल्या जातात. त्यासाठी संस्थेमार्फत प्रवेश परीक्षेद्वारे २५० उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी २०२० मध्ये ७४ पदे रिक्त आहेत. त्यासाठी संस्थेमार्फत ४०० उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे,’ असे काकडे यांनी स्पष्ट केले.
‘केंद्रीय कर्मचारी निवड आयोगामार्फत अराजपत्रित (गट ब आणि गट क) पदांसाठी २०२०-२१ मध्ये सुमारे २० हजार पदे रिक्त झाली आहेत. या पदांच्या परीक्षा पूर्वतयारीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवून मोफत प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित झाले आहे,’ असंही काकडे म्हणाले.
‘एमफील आणि पीएचडीसाठी ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’ जाहीर करण्यात आली असून, त्यासाठी २०७ विद्यार्थ्याची निवड झाली आहे. ३४ विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यांना मुलाखतीसाठी आणखी एक संधी देण्याचे ठरविण्यात आले आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.
घोषवाक्याची निवड
संस्थेसाठी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये ९४८ जणांनी सहभाग नोंदविला. ‘शाहू विचारांना देऊ या गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ या घोषवाक्याची निवड करण्यात आली आहे. हे घोषवाक्य जगदीश विष्णू दळवी यांनी पाठविले होते, अशी माहितीही काकडे यांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times