मुंबई: ३७ वर्षीय गेल्या दहा वर्षांपासून मुंबईच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांजवळील वस्तू चोरी करत आहे. तिच्याविरोधात एकूण ५३ गुन्हे दाखल आहेत. मुंबईची या ‘क्राइम क्वीन’नं चोरीतून मिळवलेल्या पैशांतून गोवंडीमध्ये फ्लॅट खरेदी केल्याचं सांगितलं जातं. यास्मीनची मुलगी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत आहे. सध्या यास्मीन रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यास्मीन सुरुवातीला बार गर्ल होती. ती अँटॉप हिल परिसरात राहते. राज्यात डान्स बारवर बंदी घातल्यानंतर यास्मीननं चोरीचा मार्ग निवडला. ती सोनसाखळी चोरणाऱ्या महिलांच्या संपर्कात आली. त्यानंतर तिनं चोरी करण्यास सुरुवात केली. यास्मीनचे दोन विवाह झाले आहेत. तिला दोन मुलं आहेत. तिची १५ वर्षांची मुलगी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत आहे.

घरात सापडले लाखो रुपये किंमतीचे सोने

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी एका शिक्षिकेनं रेल्वे पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केली. रेल्वेमध्ये बुरखा घातलेली एक महिला तिच्याजवळ उभी होती. त्यानंतर माझं गळ्यातील मंगळसूत्र गायब झालं. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर यास्मीन शेख असल्याचं उघड झालं. त्यानंतर यास्मीनला गोवंडी येथील घरातून अटक करण्यात आली. तिच्याजवळील तब्बल ५.५ तोळे सोने हस्तगत केले. यास्मीननं चोरी केलेले मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत. तिच्याकडून एकूण आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फ्लॅट खरेदी करण्यासाठी यास्मीननं १६ लाख रुपयेही दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अद्याप ती मालमत्ता तिच्या नावावर झालेली नाही.

चोरीसाठी मुलांचा वापर

यास्मीन चोरीसाठी लहान मुलाला घेऊन ट्रेनमध्ये चढायची. महिलांच्या डब्यातून ती प्रवास करायची. रडणाऱ्या मुलाला शांत करण्याच्या बहाण्यानं ती महिलांच्या पर्समध्ये हात घालून त्यातील किंमती वस्तू चोरायची. सीसीटीव्ही फुटेजपासून वाचण्यासाठी तिनं अनेकदा आपल्या चेहऱ्यासमोर बॅग धरून लपण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here