: वास्को निजामुद्दीन एक्सप्रेसमधून १२ वर्षांच्या मुलीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिप्रसंग करताना आरडाओरडा केला म्हणून एका नराधमाने सदर अल्पवयीन मुलीला रेल्वेतून बाहेर फेकलं. साताऱ्यातील लोणंद ते वाठार स्टेशनच्या दरम्यान रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

जखमी मुलीला क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मुलीची प्रकृती स्थिर असून तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तसंच हाताला दुखापत झाली. सुदैवाने मुलीच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी तातडीने साताऱ्यात येत जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमीची विचारपूस केली.

संशयिताला ‍१० तासात अटक

रेल्वेमध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे लोहमार्ग पोलिसांनी वेगाने तपास करत हे दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीला भुसावळमध्ये ट्रेन थांबवून अटक करण्यात आली असल्याचे पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षकांनी सांगितले. संशयिताने पोलिसांजवळ गुन्ह्याची कबुली दिली आहे. तो मिलिटरीमध्ये नोकरीला आहे. झाशीच्या मिल्ट्री युनिटमध्ये तो काम करतो.

नेमकं काय घडलं?
गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस ही गोव्यावरून सुटल्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमाराला साताऱ्याला येते. तिथून पुढे ती लोणंदला जाते. या अर्ध्या तासाच्या प्रवासा दरम्यान हा दुर्दैवी प्रकार घडला. S7 या डब्यात एक कुटुंब प्रवास करत होतो. त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष हा तीन मुली व पत्नीसह दिल्लीला निघाला होता. रात्री जेवण झाल्यानंतर पीडित मुलगी बर्थवर झोपली होती. यातील आरोपीने झोपेतील मुलीला उचललं आणि बाथरूममध्ये घेऊन गेला. तिथं त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वीच जाग आल्याने मुलगी मोठ्याने आरडाओरडा करू लागली.

मुलीने आरोपीला लाथा मारल्या. त्यावेळी आरोपीने ‘तू रडू नकोस मी तुला आईवडिलांकडे सोडतो’ असं सांगितलं. मुलीला घेऊन तो बाहेर आला आणि अचानक दरवाजा उघडून त्याने मुलीला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकून दिले.

रात्रभर जखमी मुलगी लोहमार्गावरच…
आदर्की स्टेशन ओलांडल्यानंतर घाट असल्यामुळे रेल्वेचा वेग कमी होता. त्यामुळे मुलगी सुदैवाने बचावली असली तरी ती जखमी झाली. रात्रभर जखमी मुलगी लोहमार्गावरच पडून होती. सकाळी सात -साडेसात वाजण्याच्या सुमारास काही स्थानिक लोकांना जखमी मुलगी लोहमार्गावर जखमी अवस्थेत दिसली. लोणंद येथील ग्रामस्थांनी उपचारासाठी तिला लोणंदच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी मुलीने रात्री घडलेला प्रकार सांगितला.

लोहमार्ग पोलिसांनी या मुलीला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिच्या हनुवटीला लागलं आहे. तसंच हातालाही खरचटलं असून पाय फ्रॅक्चर झाला आहे. गरज पडली तर तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार खासगी रुग्णालयातही हलवण्यात येईल असे सदानंद वायसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दुर्दैवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोकेशन तपासून पुढील काही रेल्वे स्टेशनवर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. भुसावळ येथे रेल्वे थांबविण्यात आली. पीडितने सांगितलेल्या वर्णनावरून संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. संशयिताने पोलिसांजवळ गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दहा तासांत रेल्वे पोलिसांनी हालचाली करून संशयिताला ताब्यात घेतले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here