पुढच्या वर्षी ५ राज्यांच्या निवडणुका वेळेवर होणारः निवडणूक आयोग
गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड विधानसभांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपणार आहे. तर उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ हा पुढच्या वर्षी मे पर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा ( sushil chandra ) यांनी माहिती दिलीय. विधानसभांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी निवडणुका घेण्याची पहिली जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. आणि विजयी उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपवली जाईल, असं चंद्रा म्हणाले.
करोना संकटाच्या स्थितीतही निवडणुका घेणार का?
देशात करोनाचा संसर्ग वाढला आहे. करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी प्रादुर्भाव थांबलेला नाही. तसंच करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभांच्या पोटनिवडणुका पुढे ढकलल्या आहेत. यामुळे करोना संकटाच्या स्थितीतही निवडणुका घेणार का? असा प्रश्न त्यांना केला गेला. यावर सुशील चंद्रा यांनी उत्तर दिलं. निवडणूक आयोगाला महामारीच्या संकटात निवडणुका घेण्याचा भरपूर अनुभव आहे, असं ते म्हणाले.
करोनाची दुसरी लाट ओसरत आहे आणि रुग्णांची संख्या कमी होत आहे. आम्ही करोना संकटातही बिहार विधानसभेची निवडणूक घेतली. आम्ही एक केंद्र शासित प्रदेश आणि ४ राज्यांच्याही निवडणुका घेतल्या. यामुळे आम्हाला महामारीत निवडणुका घेण्याचा भरपूर अनुभव आहे, असं चंद्रा म्हणाले.
पुढच्या वर्षी ५ राज्यांच्या निवडणुका होणार, मुख्य निवडणूक आयोक्तांना विश्वास
करोनाचा प्रादुर्भाव कमी होणार आणि लवकरच व्हायरस संपेल आणि पुढली वर्षी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका नियोजित वेळेत निश्चित करण्याच्या स्थिती असू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपची सत्ता आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times