यवतमाळ: नातेवाइकाच्या अस्थिविसर्जनाहून घरी परतत असताना चारचाकी वाहनाला झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झाले. कळंब-जोडमोहा मार्गावर वाढोणा गावाजवळ आज, रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यात १५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

जोडमोहा येथील बाबाराव वानखेडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी जोडमोहा येथील त्यांचे नातेवाइक वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर येथे गेले होते. विधी आटोपून परत येत असताना, वाढोणा गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकले. त्यानंतर रस्त्यालगतच्या खोल भागात जाऊन कोसळले. या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले. महादेव बावनकर (वय ५३, शेदुर्जना घाट), किसन कळसकर (वय ५५, जोडमोहा), महादेव चंदनकर (वय ५८, जोडमोहा), गणेश चिंचोलकर (वय ५२, महागाव), अमर आत्राम (वय ३२, जोडमोहा) यांचा जागीच मृत्यू झाला. एका मृताचे नाव समजू शकलेलं नाही. अपघाताची माहिती मिळताच, जोडमोहा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना तात्काळ यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, गंभीर जखमी असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या आठ झाली आहे. अन्य जखमींवर उपचार सुरू असून, त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here