नगर : ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर ()यांच्या निधनानंतर कुटुंब सावरण्याआधीच आणखी दोन मोठे धक्के बसले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांताबाई यांची कन्या आणि नातवाचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अनिता उर्फ बेबीताई असं मुलीचं नाव असून अभिजित उर्फ बबलू असं नातवाचं नाव आहे. अगदी १५ दिवसांमध्ये तिघांचाही करोनाने बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे. 25 तारखेला कांताबाई यांचं निधन झालं होतं. मात्र, त्या जाण्याअगोदरच त्यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या अनिता उर्फ बेबीताई करोनाने गेल्या. यानंतर त्यांचा नातू बबलू याचंही करोनाने निधन झालं.

अधिक माहितीनुसार, काही दिवसांआधी खेडकर कुटुंबियांना करोनाचा संसर्ग झाला होता. अनिता यांचे संगमनेरमध्ये तर अभिजित याचे नाशिकमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले.

कांताबाई सातारकर यांचा परिचय
तुकाराम खेडकर यांनी कांताबाई सातारकर यांच्यासह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने स्वतःचा तमाशा फड सुरू केला. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे खचितच आढळतील. कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या.

गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी जन्मलेया कांताबाईंना तमाशाचा तसा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आईवडील सातारा या मूळगावी आले. इथे कांताबाईंना कोणत्याही गुरुविना छोट्या मित्र मैत्रिणींसमोर नृत्य सादर करता करता त्यांना नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरू झाला.

छोट्यामोठ्या तमाशात काम करीत त्या खूप मोठी स्वप्ने घेऊन मुंबईला जाऊन पोहोचल्या. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात एक कलाकार म्हणून काम करताना त्यांच्यातील अस्सल कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. असंख्य धार्मिक, पौराणिक, सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here