सामाजिक न्याय मंत्री यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे याबाबतचा ठराव आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी ठेवला असता त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
अशी असेल योजनेची व्याप्ती
संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या अंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची जास्त संख्या असलेले ४१ तालुके निवडून त्या प्रत्येक तालुक्यात १०० विद्यार्थी क्षमता असलेले मुला-मुलींसाठी मिळून दोन वसतिगृहे असे एकूण ८२ वसतीगृहे उभारण्यात येतील. या ठिकाणी निवास, भोजन आदी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येतील.
पहिल्या टप्प्यात १० तालुक्यातील २० वसतीगृहांना मंजुरी
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ऊसतोड कामगारांची जास्त संख्या असलेले १० तालुके निवडून त्यामध्ये मुला-मुलींसाठी २ असे एकूण २० वसतीगृह उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये बीड जिल्ह्यातील परळी, केज, पाटोदा, गेवराई, माजलगाव, बीड, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व जामखेड तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी व अंबड या दहा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यातील ही २० वसतीगृहे या शैक्षणिक वर्षातच सुरू करावेत. या वसतिगृहाच्या इमारतीचे निर्माण होईपर्यंत भाड्याच्या इमारती मध्ये वसतीगृह सुरू करावेत असेही या निर्णयात नमूद करण्यात आले असून, यासाठी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवान बाबा यांच्या नावाने वसतीगृह योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज ही योजना प्रत्यक्षात उतरवली जात आहे.
स्व. गोपीनाथराव मुंडे यांना हीच श्रद्धांजली – धनंजय मुंडे
स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कष्टांचा विचार करून, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वसतीगृह योजनेचा घेतलेला हा निर्णय योगायोगाने स्व. मुंडे साहेबांच्या पुण्यस्मरण दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करत आहोत. हीच स्व. मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times