: विवाहबाह्य संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीने ठार करून घरातच पुरल्याची धक्कादायक घटना दहिसर येथून समोर आली आहे. रईस शेख असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून हत्येनंतर ११ दिवसांनी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी रईस याची पत्नी शाहिदा आणि तिचा प्रियकर अनिकेत उर्फ अमित मिश्रा या दोघांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशच्या गोंडा इथं रईस शेखचे २०१२ मध्ये शाहिदा नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं. लग्नानंतर हे दोघंही दहिसर पूर्वेकडील खान कंपाऊंडमध्ये भाड्याच्या घरात राहात होते. रईस दहिसर पूर्व, रेल्वे स्टेशनच्या जवळच असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. तर, त्याची पत्नी ही ६ वर्षाची मुलगी आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत घरीच असायची. २१ मे पासून रईस बेपत्ता असल्याची तक्रार शाहिदा हिने २५ मे रोजी दहिसर पोलिस ठाण्यात केली.

पोलिसांनी रईसबाबतची सविस्तर माहिती घेऊन त्याचा शोध सुरु केला. पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चंद्रकांत घार्गे, ओम तोटावार यांच्या पथकाने आजूबाजूच्या परिसरात माहिती घेतली असता शाहिदा आणि अमित यांच्या अनैतिक संबंधांबद्दल समजले. शाहिदा देखील उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली.

संशयाची सुई शाहिदा आणि तिच्या प्रियकराभोवती फिरत असतानाच तो गायब असल्याचे समजलं आणि संशय अधिकच बळावला. त्यात रईसच्या भावाकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरात खोदकाम सुरु केले. चार फूट खोल खणलेल्या खड्ड्यात गोणीमध्ये भरून रईसला पुरण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर मात्र शाहिदाने गुन्ह्याची कबुली दिली. झोपेच्या गोळ्या देऊन गुंगी येताच अमित आणि तिने गळा आवळून रईस याची हत्या केल्याचे सांगितले. आरे कॉलनी परिसरात लपून बसलेल्या अमितला पोलिसांनी शोधून काढले.

भाऊ आणि मुलीमुळे गुन्ह्याची उकल
रईस बेपत्ता झाल्याचे समजताच तीन दिवसांआधी गावाहून त्याचा भाऊ मुंबईत आला. याचवेळी संधी मिळताच सहा वर्षाच्या मुलीने आई आणि अमितच्या प्रेमप्रकरणाबाबत काकाला सांगितले. तसेच आई ‘जमिनीत गाडून टाकेल’ अशी धमकी देत असल्याचेही ती म्हणाली. स्वयंपाक घरातील काही लाद्या थोड्या वेगळ्या दिसत असल्याचे रईसच्या भावाला जाणवले. ही सर्व माहिती त्याने पोलिसांना दिल्यानंतर गुन्हा उघडकीस आला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here