नवी दिल्लीः करोना संटकात औषधं, उपचार ऑक्सिजन आणि लसीकरण ( ) या मुद्द्यांवरून सुप्रीम कोर्टाने ( ) आज केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. पण सुनावणीदरम्यान सरकारने कोर्टाच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित केला. त्यावर कोर्टाने राज्यघटनेचा संदर्भ दिला. नागरिकांच्या हक्कांवर हल्ला होत असेल तर कोर्ट गप्प बसणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

सरकारच्या धोरणांमध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही, असं लसीकरणाच्या ( ) मुद्द्यावरील सुनावणीवेळी केंद्र सरकारने म्हटलं. यावर कोर्टानेही उत्तर दिलं. राज्यघटनेने आम्हाला जबाबदारी दिली आहे. आम्ही त्याचे पालन करत आहोत. प्रशासनाकडून नागरिकांच्या हक्कांवर गदा येत असेल तर न्यायपालिका मूकदर्शक बनणार नाही, असं सांगत कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं.

‘मनमानी आणि तर्कहिन निर्णयांविरोधात कारवाई’

सरकारच्या निर्णयांची न्यायिक समीक्षा केली जाईल, असं सांगत सुप्रीम कोर्टाने गुजरात मजदूर सभा विरुद्ध गुजरात राज्य खटल्याचे उदाहरण दिले. नागरिकांच्या हक्कांवर गदा येत असल्यास सुप्रीम कोर्टाकडून वेळोवेळी हस्तक्षेप होत आला आहे. जगभरातील अनेक कोर्टांनी महामारीच्या आडून सुरू असलेल्या मनमानी आणि तर्कहिन धोरणांविरोधात कारवाई केली आहे, असं सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावलं.

अंधांना कोविन अॅप कसे वापरता येईल?

देशात १८ ते ४४ वर्षांदरम्यान नागरिकांना लस घेण्यासाी पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारने राज्यांवर त्यांच्या लसीकरणाची जबाबदारी सोपवली आहे. केंद्राचं हे धोरण मनमानी आणि तर्कहिन आहे. लसीकरणासाठी कोविन अॅपवर नोदंणी गरजेची आहे, त्याचा उपयोग अंध कसे करतील? देशातील निम्म्या लोकसंख्येकडे मोबाइल फोन नाहीए. त्यांचे लसीकरण कसे होईल? असे सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्रला केले.

‘लसीकरणाचा निधी कुठे खर्च केला?’
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एन. एन. राव आणि न्यायमूर्ती एस. आर. भट्ट यांच्या पीठाने केंद्र सरकारला अनेक सवाल केले. केंद्र सरकारने लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. हा निधी आतापर्यंत कुठे खर्च केला गेला? केंद्र सरकारने लसींच्या खरेदीचा हिशेब द्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटले आणि काय निर्देश दिले…

लसीकरणाचा निधी कसा खर्च केला?

करोना संकटात लसीकरण हे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारसमोर आताच्या घडीला सर्वात मोठे काम आहे. केंद्र सरकारने या वर्षी लसीकरणासाठी ३५ हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. यामुळे आतापर्यंत हा निधी कशा प्रकारे खर्च केला? १८-४४ वर्षांदरम्यानच्या नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा उपयोग का केला गेला नाही? असा सवाल कोर्टाने केला.

‘किती जणांना लस दिली? तपशीलवार माहिती द्या’

पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात किती नागरिक लसीकरणासाठी पात्र होते आणि त्यापैकी किती टक्के नागरिकांनी लस घेतली? यात एक डोस घेतलेले किती आणि किती नागिरकांनी दोन डोस घेतले? यात ग्रामीण आणि शहरी भागातील किती नागरिकांचे लसीकरण झाले? याची आकडेवारी द्या, असं कोर्टाने सांगितलं.

‘लसींचा हिशेब द्या?’

कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही या लसींची किती खरेदी केली गेली? लसींच्या खरेदीची तारीख आणि किती संख्येत डोस खरेदी केले गेले? आतापर्यंत त्यांचा किती पुरवठा झाला? याचीही माहिती द्या.

‘उर्वरीत नागरिकांचे लसीकरण कधी होणार?’

या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील संपूर्ण जनतेचे लसीकरण पूर्ण होईल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण कसे करणार? सरकारने माहिती द्यावी.

‘राज्यांच्या मोफत लसीकरणावर भूमिका स्पष्ट करा’

राज्य सरकारे नागरिकांना मोफत लस देऊ शकतात, असं केंद्राने म्हटलं आहे. पण राज्य सरकारे नागरिकांना मोफत लस देणार आहेत की नाही? हे राज्यांनी स्पष्ट करावं. राज्यांनी दोन आठवड्यात यासंबंधी आपली स्थिती स्पष्ट करावी आणि आपलं धोरण समोर मांडावं.

‘धोरणाशी संबंधीत कागदपत्र द्या’

देशातील धोरणाशी संबंधीत केंद्र सरकारचा विचार मांडणारी सर्व आवश्यक कागदपत्र कोर्टासमोर सादर करावी.

लसींच्या किमतींवर सवाल

राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना लस उत्पादन कंपन्यांकडील ५० टक्के पुरवठा हा आधी निश्चित केलेल्या किंमतीवर होत आहे. अधिक उत्पादकांनी पुढे यावं यासाठी किंमतींबाबत धोरण निश्चित करण्यात आलं आहे. पण फक्त दोनच लस उत्पादक असताना हा तर्क योग्य ठरतो का? अधिक प्रमाणात लसींच्या डोसेसची ऑर्डर दिल्याने ते स्वस्तात मिळत आहेत. मग केंद्र सरकार १०० टक्के डोसेस का खरेदी करत नाही? असे प्रश्न सुप्रीम कोर्टाने केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here