‘ट्विटवर उत्तर देताना जे काही लिहलं होतं ते मी लिहलं नव्हतं. बीकेसी येथे एक कार्यक्रम सुरु असताना माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाइल होता. शिवसैनिक कार्यकर्त्याने तो राग व्यक्त केला होता. पण ते चुकीचं होतं. माझ्या लक्षात आल्यानंतर त्या कार्यकर्त्याला मी समज दिली असून ते ट्वीट मी लगेच डिलीट केलं आहे,’ असं स्पष्टीकरण पेडणेकर यांनी दिलं आहे. तसंच, ‘या प्रकरणावरुन मी एक धडा मिळाला आहे. कोणीही किती जवळचा असला तरी आपला मोबाईल कोणाच्याही हातात देता कामा नये,’ असंही त्या म्हणाल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
बुधवारी किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावर एका ट्विटर युजरनं लस पुरवठ्याचं कंत्राट कोणाला दिलं?, असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना तुझ्या बापाला असं उत्तर देण्यात आलं होतं. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अधिकृत अकाउंटवरुन हे ट्वीट केल्यानं सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले होतं. अनेकांनी महापौरांवर टीकाही केली होती. त्यानंतर महापौरांनी हे ट्वीट डिलीट केले होतं. मात्र, या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भाजपनं केली होती टीका
लशींचे कत्रांट कोणाला दिले?, असा प्रश्न विचारणाऱ्या मुंबईकराला तुझ्या बापाला असं उत्तर देणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पक्षसंस्कृतीचे दर्शन घडवलंय. ते ट्वीट महापौरांनी डिलीट केलं असलं तरी मुंबईच्या प्रथम नागरिकांची ती असभ्य अक्षरं कायमची कोरली गेलीच, असं ट्वीट भाजपनं केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times