अकोले तालुक्यातील सर्व गावांच्या सरपंचाना पिचड यांनी एक पत्र पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, ‘मी आज ८० वयाचा झालो. ८१ वर्षात प्रदार्पण करीत आहे. अकोले तालुक्याने मला सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून आपण सर्वांनी आपले गाव करोना मुक्त करावे, अशी आपणास विनंती आहे. करोनामुळे मोठे संकट आपल्या पुढे उभे आहे. करोना संकटाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी आपण आपले गाव करोना मुक्त करावयाचा संकल्प करावा. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे गाव करोना मुक्त करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गावात विनामास्क फिरता कामा नये, गर्दी टाळा, लग्न समारंभ कमीत कमी लोकांमध्ये करा, सार्वजनिक ठिकाणी करोना पसरेल असा प्रसंग टाळा, संपूर्ण गाव करोना मुक्त होण्यासाठी गावामध्ये १०० टक्के लसीकरण करण्याचा कार्यक्रम करावा. आपण ठरवले तर आपले ग्रामसवेक, तलाठी, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांचे सहकार्य घेवून गावात प्रभावी उपाययोजना करावी. गावात जंतुनाशक फवारणी करावी. किरकोळ आजार थंडीताप, खोकला येत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘गावात होमकॉरांटाईन करण्याऐवजी जवळच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णाला दाखल करावे. गावपातळीचे नियोजन निवडून आलेल्या प्रत्येक वार्डच्या सदस्यांनी करावे. आपल्या तालुक्यात मी पूर्वी लोकप्रतिनिधी असताना ४ ग्रामीण रुग्णालये, १० प्राथमिक आरोग्य केंद्रे व ८० प्राथमिक उपकेंद्रे यांची निर्मिती करुन ठेवली आहे. तालुक्यातील सर्व जनतेने या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. तसेच कोविडच्या लसीकरणाबाबत आदिवासी भागात गैरसमज पसरविण्यात आलेला आहे. लसीकरण केल्यास माणसे मरतात व शारिरीक दृष्ट्या अपंग होतात, असे असलेले गैरसमज दूर करण्याची गरज आहे. कोविड लसीकरणामुळे मृत्यू होतो, असे तज्ञ डॉक्टरांचे मत नाही. उलट लसीकरण केल्यामुळे माणसे करोना विरुध्द लढण्यास तयार होतील. लसीकरणाची मोहीम पूर्ण भारतात सुरू आहे. याचा फायदा सर्वांनी घ्यावा व असलेले गैरसमज दूर करावे. आपले गाव करोनामुक्त झाल्यावर आपला तालुका करोनामुक्त होईल. आरोग्य सेवा व संस्था कार्यरत आहेत त्याचा लाभ घ्यावा. सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करुन गाव करोना मुक्त होण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहनही पिचड यांनी पत्रात केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times