मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि सत्ताधारी असा वाद आपण सगळ्यांनीच पाहिला. तीन चाकी हे सरकार टिकणार नाही अशी टीका वारंवार भाजपकडून करण्यात आली. यात महाविकास आघाडीमध्ये अनेक अंतर्गत मदभेद असल्याचं समोर आलं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का? असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. अशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना काँग्रेस राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढेल असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आघाडी बिघाडी होईल का अशा चर्चांना उधाण आलं आहे.

खरंतर, राज्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठा वाद सुरू असल्याची माहिती समोर आली होती. मविआ सरकारमधून काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर मागे घेतला नाही तर काँग्रेसनं ही टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं असल्याचं काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळेच पदोन्नतीतील आरक्षणावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार यावर मविआ सरकार टिकून असल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर सरकार टिकतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here