: करोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा अद्यापही पूर्णपणे सैल झालेला नसताना काही नागरिकांचा बेजबाबदारपण कमी होत नसल्याचं चित्र आहे. बुलडाण्यात रात्री अपरात्री रस्त्यावर आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे.

पोलिसांनी रात्री अपरात्री गर्दी करून वाढदिवस साजरा करणाऱ्या या ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हे तरुण रस्त्यावर गाडी उभी करून केक कापताना आढळले होते.

खामगाव शहरातील बाळापूर फईल सुदर्शन चौकात काही लोक एकत्र जमून वाढदिवस साजरा करत होते. ही माहिती शहर पोलीस ठाण्याला मिळाली. माहिती मिळताच रात्री पेट्रोलिंगसाठी तैनात असलेले पोलिस अधिकारी सुदर्शन चौकात तातडीने पोहोचले. त्या ठिकाणी ५ जण रस्त्यावर गाडी आडवी लावून गाण्याच्या ठेक्यावर तोंडाला मास्क न लावता डान्स करत केक कापत असल्याचे पोलिसांना आढळले.

यावेळी पोलिस पोहोचल्याचे लक्षात येताच सर्व जण पळून जात असताना पोलिसांनी बर्थडे बॉय रोहन संजय बामणेट याला पकडण्यात यश आले. त्याच्याकडे एक तलवारही आढळली आहे. या प्रकरणी बर्थडे बॉय रोहन सह ५ युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वाढदिवस म्हटलं की रस्त्यावर गाडी लावून केक कापण्याचं नवं फॅड आजकाल तरुणांच्या डोक्यात शिरलं आहे. रात्री अपरात्री रस्त्यावर आपल्या भाईचा बड्डे साजरा करण्यात या तरुणांना मोठं थ्रील केल्यासारखं वाटतं. मात्र बुलडाण्यात अशा तरुणांवर कडक कारवाई करत पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here