‌म. टा. विशेष प्रतिनिधी,

करोनानंतरच्या अवस्थेमध्ये म्युकरमायकोसिसचा (बुरशीजन्य आजार) संसर्ग मुंबई, तसेच राज्याच्या विविध भागांत झाला आहे. आतापर्यंत या आजारामुळे एकूण ५९ जणांना प्राण गमावावा लागला. यामध्ये १७ रुग्ण मुंबईतील असून, ४२ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. पालिका रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंचे प्रमाण हे ३७ असून यातील दहा रुग्ण हे मुंबईमधील आहे, तर २७ मृत्यू झालेले रुग्ण हे मुंबईबाहेरील आहेत. खासगी रुग्णालयामध्ये २२ जणांचे मृत्यू हे म्युकरमायकोसिसमुळे झाले असून त्यापैकी ७ मुंबईतील तर १५ व्यक्ती या मुंबईबाहेरील होत्या.

म्युकरमायकोसिससाठी पालिका एकूण ४९७ रुग्ण हे वैद्यकीय उपचार घेत असून त्यात १५० मुंबईतील रुग्णांचा समावेश आहे. मागील आठवड्यापासून या संसर्गामुळे दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. मात्र ते थांबलेले नाही. औषधांची उपलब्धता अद्याप सुरळीत झालेली नाही. तीन ते एकवीस दिवसांसाठी प्रतिदिवस सहा इंजेक्शन्सहून अधिक वायल्सची गरज असते. मात्र उपलब्धता पुरेशी नसल्यामुळे त्याचा पुरवठा अद्याप सुरळीतपणे सुरू झालेला नाही. त्यामुळे एक ते दोन दिवस पुरतील इतकी इंजेक्शन्स दिली जातात. २० मेपासून पालिकेकडे सार्वजनिक व खासगी रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. यासाठी एक गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. तो भरल्यानंतर त्यातील माहितीनुसार इंजेक्शनची उपलब्धता किती लागणार आहे, प्राधान्याने इंजेक्शन कुणाला देण्याची गरज आहे, हा निर्णय डॉक्टर घेतात, असे पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. उपलब्ध माहितीमध्ये खासगी व सार्वजनिक रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी ४२ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ही ३५७ इतकी असून त्यात मुंबईतील १११ तर मुंबईबाहेरील २४६ रुग्णांचा समावेश आहे.

सार्वजनिक रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २१० असून १५२ रुग्ण हे मुंबईबाहेरील आहेत. सार्वजनिक रुग्णालयातून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ३६ असून त्यात राज्यातील १२ रुग्णांचा समावेश आहे. खासगी रुग्णालयात २२ जणांचा मृत्यू म्युकरमायकोसिसमुळे झाल्याची नोंद करण्यात आली आहे तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ही ३९ आहे. सध्या वेगेवगळ्या खासगी रुग्णालयामध्ये १३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here