म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील कडक निर्बंध हटविण्याच्या दृष्टीने एक-एक पाऊल टाकण्यात येत असून या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांची पाच टप्प्यात विभागणी करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र त्यानंतर लगेचच राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नसून नव्या नियमांचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावर वडेट्टीवार यांनी लगेचच घुमजाव करीत, पाच टप्प्यांनुसार निर्बंध शिथिल करण्याबाबत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगितले. साहजिकच यामुळे राज्यातील कडक निर्बंध तूर्तास कायम असल्याचे तर स्पष्ट झाले; पण या निमित्ताने राज्य सरकारमधील अ‘निर्बंध’ गोंधळही दिसून आला.

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी निर्बंध शिथिल करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारमध्ये कुठलीही गफलत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत कडक निर्बंध हटविण्यासाठी पाच टप्प्यांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पाच टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याचे सांगताना वडेट्टीवार यांनी यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आल्याचेही सांगितले.

सध्याच्या परिस्थितीत पाच टप्प्यांनुसार अनलॉक केले जाईल. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकाने किंवा रेल्वे देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगरपालिकांचे मिळून एकूण ४३ भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची आज, शुक्रवारपासून अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लॉकडाउन लादणे हे सरकारचे काम किंवा जबाबदारी नाही. ज्या भागातील जनता सहकार्य करेल त्या भागातील निर्बंध कमी करायचे हे धोरण ठरवले. ऑक्सिजन बेड, पॉझिटिव्हिटी रेट यावरून पाच टप्पे ठरवले. टप्प्याटप्प्याने कडक निर्बंध शिथिल करायचे असे ठरले, त्याला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच राज्य सरकारकडून याबाबत खुलासा करण्यात आला. करोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. करोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘’मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत आहेत. यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले. अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.

वडेट्टीवार म्हणाले…
– पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेड रिक्त असलेल्या जिल्ह्यांत संपूर्ण अनलॉक

– अशा जिल्ह्यांत रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकाने तसेच रेल्वे देखील सुरू होतील.

– या सर्व नियमांची आज, शुक्रवारपासून अंमलबजावणी केली जाणार

सरकार म्हणाले…

– करोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. त्यामुळे राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत.

– ‘ब्रेक दि चेन’मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे.

– विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे सांगण्यात येतील.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here