बीड : राज्यात आधीच करोनाचं संकट असताना आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याची चिन्ह आहे. कारण, ५ जून म्हणजेच उद्यापासून राज्यात मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला सुरूवात होणार आहे. यासंबंधी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सरकारला थेट अल्टीमेटम दिला आहे.

विनायक मेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमधून मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला सुरुवात होणार असून यानंतर राज्यात सर्वत्र मोर्चा निघणार आहे. मराठा समाजाच्या हितासाठी सरकारला अल्टीमेटम देण्याची वेळ संपली आहे, असंही यावेळी विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर मराठा समाजाच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात रोष आहे तो उद्या रस्त्यावर पाहायला मिळेल, असा इशाराही विनायक मेटे यांनी दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही धक्का न देता उद्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे करोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी दौरा सुरू केला असून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या लाभाच्या दृष्टीनं काही मागण्या केल्या आहेत. सहा जूनपर्यंत सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरवर्षी ५ व ६ जून रोजी हा सोहळा रायगडावर थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, यंदा सरकारनं केवळ २० लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळं शिवभक्तांनी घरातच राहून शिवराज्याभिषेक साजरा करावा, असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

108 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here