मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत अनलॉक होणार असल्याची माहिती दिली होती. संसर्गाचा दर आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची उपलब्धता या निकषावर जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली आहे व हे जिल्हे टप्प्याटप्प्यानं निर्बंधमुक्त होतील, असं त्यांनी सांगितलं होतं. शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असंही ते म्हणाले होते. ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत खुलासा केला. ‘असा कुठलाही निर्णय झालेला नाही. निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव केवळ विचाराधीन आहे’, असं म्हटलं होतं. त्यामुळं मोठा संभ्रम निर्माण झाला होता. विजय वडेट्टीवार यांनी काल त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, विरोधी पक्षानं या निमित्तानं राज्य सरकारवर टीकेची संधी साधली.
वाचा:
रायगडमध्ये आज पत्रकार परिषदेला संबोधित करताना अजित पवार यांनी यावर सविस्तर मत मांडलं. ‘अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. करोनाची साथ आल्यापासून मुख्यमंत्री हे स्वत: सोशल मीडियाच्या व टीव्हीच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. संवाद साधतात. अनेक गोष्टींची माहिती देतात. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री म्हणून राजेश टोपे हे काही बाबी स्पष्ट करत असतात. विजय वडेट्टीवार हे देखील माध्यमांशी बोलत असतात. कालही ते बोलले. मात्र, बैठकीतील चर्चेची माहिती देताना एक शब्द त्यांच्याकडून राहून गेला होता. त्यातून गैरसमज पसरले गेले,’ असं अजित पवार म्हणाले. ‘सरकार कोणाचंही असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील तो अंतिम निर्णय असतो,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
करोनाची दुसरी लाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं आटोक्यात आली आहे, असा भाजपचा दावा असल्याचं पत्रकारांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणलं. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘जनतेला सगळं समजतं. जनता दुधखुळी नाही. प्रत्येक पक्षाचे नेते आपापल्या परीनं स्वत:च्या पक्षाचं व नेत्याचं समर्थन करत असतात. तो त्यांचा अधिकार आहे. पण कोणामुळं काय होतंय ते मीडियाला, लोकांना चांगलं कळतं. त्यामुळं मला त्या फंदात पडायचं नाही.’
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times