मुंबई : दोन दिवस उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने आता संपूर्ण केरळ व्यापला आहे. कर्नाटकाच्या किनारपट्टीचा बहुतांश भाग, कर्नाटकचा अंतर्गत भागातही मान्सून दाखल झाला असून कारवारपर्यंत पोहोचला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर येत्या दोन ते तीन दिवसांमध्येच महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यताही भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

नैऋत्य मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जाहीर केले. हवामान अनुकूल असल्यामुळे पुढील दोन दिवसांत मान्सून कर्नाटकच्या काही भागांपर्यंत पोचण्याची शक्यताही ‘आयएमडी’ने वर्तवली आहे. मान्सून तीन जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा सुधारित अंदाज याआधी ‘आयएमडी’ने वर्तवला होता. या अंदाजानुसार सर्वसाधारण तारखेपेक्षा दोन दिवस उशिराने मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला.

दरम्यान, केरळनंतर लवकरच गोवा व तळकोकणासह राज्यात मॉन्सून येणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. सध्या अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय होऊ लागले आहेत. केरळ व लगतच्या समुद्रात चांगलेच ढग जमा होत असून, पावसाचे प्रमाण वाढू लागले आहे.

केरळमधील १४ हवामान केंद्रांपैकी ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस २.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यावर मान्सूनचे आगमन जाहीर केले जाते. त्याचसोबत वाऱ्याची दिशा (पश्चिम, नैऋत्य), वेग (ताशी २७ ते ३७ किमी), उंची (जमिनीपासून सुमारे ४५०० मीटर) आणि ढगांचे प्रमाणही गृहित धरले जाते. गुरुवारी हे सर्व निकष लागू झाल्यामुळे मान्सूनचे केरळच्या दक्षिण भागात आगमन झाल्याचे ‘आयएमडी’ने जाहीर केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here