या भागात आढळलेल्या पांढऱ्या कावळ्याने गेल्या काही दिवसांपासून लक्ष वेधून घेतलं असून या कुतूहलाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे . बोरी अडगावात झाडांवर शुभ्र कबुतरासारखा पांढरा कावळा दिसून आला आहे. येथील शिवाजीराव पाटील यांच्या घराजवळ येणाऱ्या पाखरांमध्ये पाटील यांना एक वेगळाच पक्षी असल्याचे आढळले.
कुतूहल म्हणून त्यांनी निरीक्षण केलं, तेव्हा त्या पक्ष्याची ठेवण चोच आणि डोळे हे कावळ्या सारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा आवाज ऐकल्यावर तो कावळाच असल्याची खात्री त्यांना पटली. यांनी ही बाब शेजारच्यांना सांगितली व त्यांनी छायाचित्रे, चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली. थोड्याच वेळात हे कुतूहल संपूर्ण परिसरात पसरले .
अशा प्रकारचा कावळा क्वचितच आढळतो. खरंतर, पांढरा कावळा ही कोणतीही नवीन प्रजाती नसून अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परिवर्तन आहे . पक्षी प्राण्यांच्या शरीराचे रंग विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात. ही रंगद्रव्ये मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनसया प्रकारची असतात. या तीनही रंगद्रव्यांची कमी – जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते किंवा बिघडवू शकते.
यापैकी मेलानिनचा या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पिसे पूर्ण पांढऱ्या रंगाची होतात. कावळ्याबाबत असे झाले असावे, असे पक्षीमित्र राहुल सुरवाडे यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times