‘मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सून रेषा राज्यात द.कोकणात हर्णेपर्यंत तसंच द.मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत आहे. मराठवाड्याचा काही सलग्न भाग असून परिस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल आहे,’ अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
अंदाजाच्या ५ दिवस आधीच मान्सूनची धडक
मान्सून महाराष्ट्रात १० जूनला दाखल होईल, असा अंदाज याआधी हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र ३ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर दोन ते दिवसात मान्सूनचं आगमन होईल, असं सांगितलं गेलं. मात्र वेगवान प्रवास करत आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला.
देशातील विविध भागांत पोहोचला मान्सून
यंदा देशभरात चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील विविध भागात वेळेच्या आधीच मान्सूनचं आगमन झालं. आतापर्यंत गोवा, महाराष्ट्रातील काही भाग, दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा काही भाग, तामिळनाडू या भागांमध्ये मान्सूनने धडक दिली आहे.
दरम्यान, करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात अर्थव्यवस्थेची मदार ही कृषी क्षेत्रावर अधिक असणार आहे. यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्यामुळे कृषी अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times