मुंबई : करोनाची दुसरी लाट राज्यात पसरू लागल्याने सर्वप्रकारच्या चित्रीकरणावर सरकारने बंदी घातली होती. त्यामुळे मालिका, सिनेमांचे चित्रीकरण बाहेरील राज्यात सुरू झाले होते. परंतु बाहेरील राज्यात जाऊन चित्रीकरण करणे निर्मात्यांना त्रासदायक होते. याचमुळे कधी महाराष्ट्रातील चित्रीकरणावरील बंदी मागे घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्व मनोरंजन विश्वाला दिलासा देणारा निर्णय शनिवारी राज्य सरकारने जाहीर केला.

येत्या सोमवारपासून म्हणजे ७ जूनपासून ज्या ठिकाणी नियंत्रणात आला आहे, अशा ठिकाणी चित्रीकरणाला सशर्त परवानगी दिली आहे. ही चित्रीकरणे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे त्या विभागातील मॉल आणि सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी मुख्यमंत्री यांनी दिली आहे.

नवीन एसओपी जारीमुंबईत लॉकडाउन शिथील करत अनलॉकची प्रक्रिया सुरू होण्यावरून गुरुवारी आणि शुक्रवारी खूपच गोंधळ निर्माण झाला होता. परंतु महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत संपूर्ण राज्यातील सर्वंकष परिस्थितीचा आढावा घेतला आणि काही नियम (एसओपी) तयार करून ते जारी केले. मुख्यमंत्री कार्यालायने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामध्ये नवीन एसओपीनुसार शहरे तसेच गावांमधील मॉल, सिनेमागृह, दुकाने उघडण्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. राज्यातील विविध भागांमधील करोना रुग्णांची संख्या कमी आहे अशा ठिकाणची माहिती, तसेच राज्यातील हॉस्पिटलमध्ये असलेल्या ऑक्सिजन बेड्सची उपलब्धतेचीही माहिती या एसओपीमध्ये दिली आहे.

चित्रीकरण ५ वाजेपर्यंत आणि बायोबल मध्येच करा
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईतील पॉझिटिव्हीटीचा रेट हा ५.५६ टक्के इतका आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या एसओपीमध्ये ही स्थिती लेवल तीनमध्ये येते. ज्या शहरांत, गावांत, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचा रेट हा ५ ते १० टक्क्यांमध्ये आहे तिथे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे पेशंट ४० टक्क्यांहून अधिक आहे ते सर्वजण लेवल तीनमध्ये येतात. अशा जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमाची चित्रीकरणे केली जाऊ शकतात. परंतु त्यासाठी काटेकोर नियमांचे पालन सक्तीचे आहे.

आखून दिलेल्या नियमांमध्ये सर्व चित्रीकरण व्हायलाच हवे. त्यामध्ये चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना ‘बायोबबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक आहे. म्हणजे चित्रीकरण अशा ठिकाणी करावे लागेल की जिथे निर्मात्यांचे सर्वांवर नियंत्रण असेल. तसेच चित्रीकरण जोपर्यंत सुरू असेल तोपर्यंत त्यात सहभागी असलेल्या कुणालाही तिथून बाहेर जाता येणार नाही. चित्रीकरणाला संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर चित्रीकरण बंद करावे लागणार आहे.

..तर मॉल, सिनेमागृहेही सुरू करणार

महाराष्ट्र सरकारने हेदेखील सांगितले आहे की, जर कोणत्या जिल्ह्यामध्ये करोना संक्रमणाचा दर पाच टक्क्यांहून कमी असेल आणि हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले ऑक्सिजनचे बेडवर २५ टक्क्यांहून कमी रुग्ण असतील तर अशा जिल्ह्यांमध्ये सर्व व्यवहार हे सामान्यपणे होऊ शकतील. म्हणजेच अशा ठिकाणी असलेले मॉल, सिनेमागृह त्यांच्या क्षमतेप्रमाणे कार्यरत करता येतील. एसओपी अंतर्गंत या ठिकाणचे व्यवहार आधीसारखे सुरळीतपणे करता येतील. दरम्यान, अशा ठिकाणचे सिनेमागृह १०० टक्के सुरू करता येतील का, असा प्रश्न सिनेमा वितरकांना पडला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध केलेल्या एसओपीनुसार लेवल २ मध्ये असलेल्या जिल्ह्यांमधील सिनेमागृह, मॉल हे केवळ ५० टक्के क्षमतेने खुले करण्याचे निर्देश दिले आहेत. या ठिकाणचा करोना संक्रमणाचा रेट पाच टक्क्यांहून कमी असायला हवा. तसेच येथील हॉस्पिटलमधील ऑक्सिजन बेडवरील पेशंटची संख्या २५ ते ४० टक्क्यांमध्ये असली पाहिजे.

निर्मात्यांना मोठा दिलासा
मुंबईमध्ये चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यामुळे सिनेमा, मालिका, बेव सीरिज निर्मात्यांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यांच्या डोक्यावरचे मोठे ओझे दूर झाले आहे. अर्थात यासाठी या सर्वांना सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत सर्व सूचना आणि नियमांची सविस्तर माहिती संबंधितांपर्यंत पोहोचवली जाईल. त्यानंतरच या सर्व निर्मात्यांना त्यांचे गुजरात, दमण आणि दीव येथे सुरू असलेली चित्रीकरणाचे सेट मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.

ज्या मालिकांची चित्रीकरणे उत्तर भारतामध्ये सुरू आहेत, त्यांचे मुंबईला परत येण्याच्या शक्यता कमी आहे. काहीही असले तरी करोनामुळे मुंबईमधील चित्रीकरणांना जो दीर्घ काळापासून ब्रेक लागला होता तो आता मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह मुंबईतही चित्रीकरणाला सुरुवात होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दर आठवड्याला आढावा घेणार

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने जारी करण्यात आलेल्या या एसीपीनुसार सर्व व्यवहार केले जात आहेत की नाही याचा आढावा दर गुरुवारी घेतला जाणार आहे. हा आढावा राज्याच्या आरोग्य विभागातर्फे आठवड्या आठवड्याला घेतला जाणार आहे. त्यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील करोना संक्रमणाचा पॉझिटिव्हीटी दर, तिथल्या हॉस्पिटमध्ये उपलब्ध असेलेल्या ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची टक्केवारी तपासली जाणार आहे. त्या तपासणीनंतर दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातील लेवलमध्ये फेरफार केले जातील. या जिल्ह्यांमध्ये शनिवारी एसओपीनुसार प्रतिबंध अथवा सूट लागू केली जाणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here