: एसआरपीएफमधून शहर पोलिस दलात रुजू झालेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने मध्यरात्री वसाहतीतच झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. मनोहर अंबादास वानखडे (५४) असं आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

मृतक पोलिस कर्मचारी मनोहर वानखडे हे तीन आठवड्यापूर्वीच एसआरपीएफमधून शहर पोलिस दलात रुजू झाले होते. मनोहर वानखडे हे एसआरपीएफमध्ये होते. १२ मे रोजी ते एसआरपीएफमधून शहर पोलिस दलात बदलीवर आले होते. एसआरपीएफमध्ये ते एएसआय होते, शहर पोलिस दलात बदलीमुळे ते पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते. त्यांची नेमणूक शहर पोलिस दलातील मुख्यालयात होती. ते २० मे पासून रजेवर होते.

सध्या मनोहर वानखडे यांचे वास्तव्य एसआरपीएफ वसाहतीतच होते. शुक्रवारी रात्री वानखडे यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून दोन क्वॉर्टर सोडून असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. या वेळी त्यांनी गणवेषातील लाईन यार्ड (गणवेशातील खांद्यावरील खाकी किंवा काळी दोरी), मोबाइल चार्जरचा केबल गळफास घेण्यासाठी वापर केला.

घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता मिळाली. या आधारे पोलिस पथक घटनास्थळी गेले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. शनिवारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.

दरम्यान, वानखडे यांनी आत्महत्या का केली, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती फ्रेजरपुराचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी दिली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here