: दुसऱ्या लाटेत करोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणी अमरावती पॅटर्न लागू करण्यात आला. याच धर्तीवर आता जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत जिल्ह्यात प्रबोधन अभियान राबवण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली आहे.

म्युकरमायकोसिसबाबत वेळीच निदान व वेळेत उपचार होणे हे सगळ्यात महत्वाचे असते. त्यामुळे कुठलेही लक्षण आढळल्यास तत्काळ उपचार सुरु करावे. आशा स्वयंसेविका करोना साथीच्या नियंत्रणासाठी महत्वपूर्ण कामगिरी पार पाडत असून सर्वेक्षणासाठी नागरिकांनी त्यांना परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

म्युकरमायकोसि या गंभीर आजाराबाबत व्यापक प्रबोधन करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. तालुका स्तरावर स्थापित हेल्पलाईन यंत्रणेद्वारे बरे झालेल्या बाधितांशी नियमित संपर्क ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने गावोगाव सर्वेक्षण व जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली असून ७ ते ९ जून दरम्यान आशा सेविका या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत.

करोनामधून बरे झालेल्या बाधितांच्या घरी भेटी देऊन कोविडपश्चात घ्यायची काळजी, लक्षणांबाबत माहिती देणे व कुणाला लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार मिळवून देणे ही कामे करण्यात येणार आहेत.

आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून गावनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कामासाठी आशा स्वयंसेविकांना दीडशे रुपये प्रतिदिवस प्रोत्साहन भत्ताही देण्यात येणार आहे. तसे आदेश सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. रणमले यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here