अहमदनगर: करोनामुळे पालक गमावलेली मुले, घरातील कर्ता व्यक्ती गमावल्यामुळे अडचणीत सापडलेली कुटुंब यांच्यासाठी सरकारकडून विविध योजना जाहीर झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या आधीच काम सुरू केलेल्या स्नेहालय परिवाराच्या ‘मिशन राहत’ने अशा कुटुंबांपर्यंत थेट मदत पोहोचविली आहे. नगर जिल्ह्यातील ७० कुटुंबांना २१ लाखांची मदत देण्यात आली आहे.

वाचा:

करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. कित्येक मुलांनी त्यांचे आई-वडील गमावले. काही कुटुंबातील कर्त्या व्यक्ती गेल्या. त्यामुळे सर्वांचेच हाल सुरू झाले. त्यांना मदतीची गरज लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. मात्र, त्यांची पूर्तता आणि बाकीच्या गोष्टीच अद्याप सुरू आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मदत मिळण्यास आणखी विलंब लागणार आहे. अशा परिस्थितीत स्नेहालय परिवाराने सुरू केलेले स्नेह सहयोग अभियान सर्वस्व गमाविलेल्याना जगण्याची आशा देत आहे. प्रत्येक बाधित परिवारास तीस हजार रुपये मिळण्यासाठी ‘गिव्ह इंडिया’च्या सहयोगाने प्रयत्न सुरू आहेत. आजपर्यंत ७० बाधितांच्या खात्यात २१ लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. स्नेहालय संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण मुत्याल आणि अजित कुलकर्णी या उपक्रमाचे समन्वयक आहेत. कमावता व्यक्ती गमावलेल्या बाधित कुटुंबांना १० हजार रुपयांची मदत, तातडीचे उपचार आणि किराणा साहित्यासाठी तातडीची मदत देण्यात आली. स्व. विश्वनाथराव बिरेवार फाउंडेशन तर्फे या उपक्रमासाठी प्रारंभिक मदत मिळाली. याशिवाय इतर दानशूरांकडून मदत मिळत आहे. नगर जिल्ह्यातील साडेतीन हजार कुटुंबांशी ‘मिशन राहत’च्या टीमने थेट संपर्क केला आहे. युवानिर्माण प्रकल्पाचे स्वयंसेवक घरोघर जाऊन कुटुंबीयांकडून आर्थिक सहयोगासाठी आवश्यक पूर्तता करून घेत आहेत.

वाचा:

यासंबंधी स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे म्हणाले, ‘ संसर्गित मृत्यू झालेल्या कुटुंबातील वारसदारांना आर्थिक सहयोग मिळाल्यामुळे जीवनाचा चरितार्थ चालू राहील. कठीण प्रसंगात केलेली मदत निश्चितच प्रशंसनीय आहे. स्नेहालयाने हाती घेतलेले उपक्रम खूप चांगले आहेत.’

सर्व जिल्ह्यांत उपक्रम

राज्यातील सर्व जिल्ह्यांत हा उपक्रम राबविण्यासाठी स्नेहालय परिवाराने पुढाकार घेत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन आणि प्रशिक्षण दिले आहे. राज्यातील किमान ५० हजार बाधित कुटुंबापर्यंत मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आहे. अधिक माहिती आणि स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी ९०११०२०१७४ किंवा ९०११०२६४८५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here