मुंबईः मान्सून राज्यात शनिवारी दाखल झाल्यानंतर रविवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा दक्षिणेकडील काही भाग, तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि उस्मानाबाद जिल्हा व्यापला. तसंच, आज मुंबई व उपनगरात पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

आगामी दोन ते तीन तासांत मुंबई आणि उपनगरात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस कोसळ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी रात्री मुंबई व परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. तसंच, पुढच्या तीन तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पावसासाठी अनुकूल स्थिती

मध्य पूर्व अरबी समुद्रात वातावरणात साडेचार किमी उंचीपर्यंत चक्रीय स्थिती आहे. दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत समुद्र किनाऱ्याला समांतर कमीदाबाचा पट्टाही (ऑफ शोअर ट्रफ) सक्रिय आहे. त्याचसोबत मान्सूनच्या वाऱ्यांना असणारा जोर आणि अरबी समुद्राकडून येणारे बाष्प यांमुळे कोकणात बहुतेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ११ जूनला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्याच्या प्रभावामुळे पश्चिम किनारपट्टी, घाट क्षेत्र आणि पश्चिम महाराष्ट्रात १४ – १५ जूनपर्यंत पाऊस सक्रिय राहील असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

१०१ टक्के पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या दुसऱ्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार देशाच्या एकूण सरासरीच्या १०१ टक्के पावसाची शक्यता आहे. देशामध्ये मान्सून काळामध्ये सरासरी ८८ सेंटीमीटर पाऊस पडतो. एप्रिलमध्ये जारी केलेल्या पहिल्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार मान्सूनच्या कालावधीमध्ये सरासरीच्या ९८ टक्के पावासाचा अंदाज होता. महाराष्ट्रात जूनमध्ये मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित ठिकाणी सरासरीइतका किंवा त्याहून अधिक पावसाचा अंदाज आहे. मान्सूनच्या चारही महिन्यांचा विचार करता मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीहून कमी पाऊस असण्याची शक्यता आहे. कोकण विभागामध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

26 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here