मुंबईः मुंबईत करोनाचा जोर ओसरत असताना धारावीतूनही सकारात्मक बातमी समोर येत आहे. करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं करोनाची दुसरी लाट मात्र थोपवून धरली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत पहिल्या लाटेच्या सुरुवातीला करोनानं थैमान घातलं होतं. दाटीवाटीची वस्ती आणि सोशल डिस्टनसिंग पाळण्यात येणाऱ्या अडचणींमुळं करोनाचा उद्रेक झाला होता. मात्र, नंतरच्या काळात पालिकेच्या उपाययोजनांमुळं करोना नियंत्रणात आणण्यात यश आलं होतं. त्यानंतर मुंबईत करोनाच्या दुसऱ्या प्रादुर्भाव वाढल्यानंतर धारावीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या दुसऱ्या लाटेतही करोनाला रोखण्यात धारावीला यश आलं आहे.

रविवारी धारावीत फक्त २ रुग्ण आढळले आहेत. तर, सध्या धारावीत एकूण ६ हजार ८३५ रुग्ण आहेत. ६ हजार ४५६ रुग्णांनी करोनावर मात केली असून सध्या फक्त २० अॅक्टिव्ह रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. दादरमध्ये रविवारी ८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांची संख्या ९ हजार ४८७वर पोहोचली आहे. माहिममध्ये १२ नवीन रुग्ण सापडले असून सध्या २०१ सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत ७८६ नवे रुग्ण

मुंबई महापालिकेच्या हद्दीत रविवारी ७८६ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या सात लाख १० हजार ६४३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आजतागायत करोनामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ९७१ इतकी झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here