म. टा. प्रतिनिधी, नगर: हौशी जोडप्यांनी विविध ठिकाणी, विविध प्रकारे विवाह केल्याची अनेक उदाहरणं आहेत. आता असाच एक लग्न सोहळा पारनेर तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये झाला. आधीच विविध उपक्रमांसाठी चर्चा होत असलेल्या आमदार नीलेश लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये दोन जोडप्यांनी येऊन शुभमंगल केलं. लग्नासाठी येणाऱ्या खर्चातून करोना रुग्णांना मदत केली.

हौस म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकीतून कोविड सेंटरमध्ये जाऊन लग्न केल्याचं या जोडप्यांचं म्हणणं आहे. मुळचे पारनेरचे रहिवासी व नोकरीच्या निमित्तानं ठाण्यात वास्तव्यास असणारे सखाराम बापू व्यवहारे यांचे चिरंजीव निकेत व अहमदनगर येथील कन्या आरती नानाभाऊ शिंदे हे एक दाम्पत्य. तसेच वाजोंळी (ता. नेवासा) येथील रावसाहेब शंकर काळे यांची कन्या राजश्री व खानेगाव (ता. नेवासा) येथील जनार्दन पुंजाजी कदम या उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात अशा वेगळ्या पद्धतीनं केली.

पारनेर तालुक्यातील भाळवणी इथं आमदार लंके यांच्या पुढाकारातून शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदीर नावानं हे कोविड सेंटर सरू आहे. रुग्णसेवेसोबतच येथे होणाऱ्या विविध उपक्रमांमुळे हे सेंटर चर्चेत आहे. त्यातच आता या दोन विवाहांची भर पडली आहे. लॉकडाउनच्या काळात विवाह सोहळ्यांना बंधनं होती. शिवाय यावर खर्च करण्यापेक्षा तो सत्कारणी लावावा अशी या जोडप्यांची आणि त्यांच्या पालकांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी कोविड सेंटरमध्ये येऊन तिथं उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या साक्षीनं विवाह केला. यातून वाचलेल्या रक्कमेतून कोविड सेंटरला आवश्यक वस्तू देणगी स्वरूपात देण्यात आल्या. नातेवाईकांना बंदी होती, त्यामुळे आमदार लंके आणि तेथील रुग्णच वऱ्हाडी बनले. करोनाच्या नियमांचे पालन करीत हा सोहळा झाला.

यावेळी जितेश सरडे, राहुल झावरे, बाबाजी तरटे, बाळासाहेब खिलारी, राजेंद्र चौधरी, आशोक घुले, श्रीकांत चौरे, डॉ. सुनिल गंधे, बंडू कुलकर्णी, दत्ता कोरडे, प्रमोद गोडसे, संदीप भागवत, संदीप चौधरी दोन्ही वधू-वरांचे मामा मोजकेच नातेवाईक यांच्यासह नीलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार लंके म्हणाले, ‘या उच्चशिक्षित तरुणांनी रुग्णांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घेत हा निर्णय घेतला. त्यांनी उचललेले पाऊल हे खरोखरच ऐतिहासिक म्हणावे लागेल. त्यांनी हट्टच धरल्यानं होकार देण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आम्ही त्यांना शुभेच्छा म्हणून रोपं भेट दिली.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here