राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या आमदाराने या आंदोलनाद्वारे महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलनानतंर पोलिसांनी आमदार पाटील यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महावितरण कंपनीने सक्तीने वसुली न करता शेतकऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली होती. परंतु, तरीही वीज बिल वसुलीचा प्रकार सुरूच असल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी संतप्त आमदार पाटील यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. आधीच शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत होत नाही. जळालेले विद्युत रोहीत्र बदलून दिले जात नाहीत, अशातच आता वीजबिलांची सक्तीने वसुली सुरू आहे. यासंदर्भात तक्रारी वाढल्याने आक्रमक झालेल्या आमदार व त्यांच्या समर्थकांनी हे आंदोलन केले.
कृषी पंपांच्या वीजबिलांच्या वसुलीसंदर्भात राज्य सरकारने सवलत योजना जाहीर केली आहे. यात शेतकऱ्यांना थकीत वीजबिल, व्याजाची परतफेड करण्यासाठी २०२४ पर्यंतची टप्प्याटप्प्याने मुदत देण्यात येणार आहे. मात्र, असे असताना महावितरण कंपनी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे, असा आरोप यावेळी आमदार किशोर पाटील यांनी केला.
दरम्यान, महावितरण कंपनीने अडवणुकीचे धोरण मागे घेतले नाही, तर महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सध्या खरीप हंगामाचा पेरणीचा काळ सुरू आहे. शेतकरी व्याजाने पैसे काढून, दागदागिने विकून बी-बियाणे व खते खरेदी करत असतो. मात्र, अशा परिस्थितीत कृषी पंपांच्या वीज बिलांची वसुली करू नये, अशी मागणीही आमदार किशोर पाटील यांनी केली आहे.
भडगाव-पाचोरा विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानतंर आमदार किशोर पाटील यांच्यासह ४५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांना पोलिस ठाण्यात आणले. त्यानतंर त्यांची सुटका करण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times