नव्या नियमानुसार बाजारपेठेची वेळही दोन तासांनी वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु राहू शकतील. परंतु शनिवार-रविवार या वीकेंडच्या दोन दिवशी केवळ धान्य, किराणा, भाजीपाला, दूध-दही, बेकरी पदार्थ अशी जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने उघडी ठेवली जाणार असून इतर दुकानांवरील सध्याचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
मंगल कार्यालये आणि क्रीडांगणांना मुभा दिल्यामुळे रखडलेले लग्न समारंभ आणि आऊटडोअर खेळ स्पर्धांचा मार्ग मोकळा झाला आहे. खुल्या क्रीडांगणातील खेळ सकाळी ५ ते दुपारी १ या वेळात खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर लग्न विधीसाठी केवळ ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील (२२ ते २९ तारखेदरम्यान) पॉझिटिव्हिटी दर दहा टक्क्यांच्या आत आणि ऑक्सिजनयुक्त खाटांचा वापर २० टक्क्यांहून अधिक नसल्यामुळे अमरावती जिल्ह्याला आधीच शिथिलता मिळाली होती. १ जूनपासूनच्या त्या शिथिलतेमुळे सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत उघडी ठेवली जात आहेत.
हॉटेलमध्ये जेवायला जाऊ शकता, पण…
नव्या आदेशानुसार हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. परंतु आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश दिला जावा, अशी अट आहे. तर दुपारी ४ नंतर रात्री ८ पर्यंत पार्सल सेवा द्यावी, असे निर्देश आहेत. तसंच करोनाबाबत इतर सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे.
सभा, बैठकांना ५० टक्क्यांची अट
निर्बंध शिथिल झाल्यामुळे राजकीय व सामाजिक संस्था, संघटनांना बैठका घेता येतील. परंतु सभा-बैठकीचे जे स्थळ निवडण्यात आले आहे, त्या स्थळाच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के उपस्थितीतच असे कार्यक्रम घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. हीच अट मनोरंजनाच्या श्रेणीतील नृत्य-नाट्यालाही लागू असेल. परंतु हे सर्व कार्यक्रम संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीनेच घेता येणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times