या कोविड सेंटरमधून असे अनेक रुग्ण बरे होऊन बाहेर पडले आहेत. मात्र, या आजींच्या धाडसाचे कौतूक होत आहे. त्यांच्या उपचारासाठी स्वत: डॉ. विखे यांनी घातलेले लक्ष आणि बरे झाल्यानंतर आजीबाई आणि डॉ. विखे यांची भेट यामुळे त्यांची चर्चा झाली. राहुरी तालुक्यातील वरवडे गंगुबाई बर्डे (वय ७०) यांना करोनाची लागण झाली. मुळा धरणाच्या दुर्गम भागात आदिवासी वस्तीवर त्या राहतात. लक्षणे दिसल्यावर त्यांचा मुलगा अकुंश बर्डे यांनी तपासणी करून घेतली. त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगून तातडीने व्हेंटीलेटर सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी बेडची स्थिती आजच्याप्रमाणे नव्हती. त्यामुळे त्यांना शोधाशोध करावी लागली.
बर्डे यांनी थेट खासदार डॉ. विखे यांना गाठले. आपल्या आईची परिस्थिती त्यांना सांगितली. त्यावेळी विखे एका बैठकीत होते. तातडीची गरज लक्षात त्यांनी यामध्ये लक्ष घातले. बर्डे यांना डॉ. विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. स्वत: त्यांची विचारपूस करून धीर दिला.
हॉस्पिटलमध्ये १४ दिवस उपचार घेतल्यानंतर बर्डे आजी ठणठणीत बऱ्या झाल्या. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून जाताना त्यांनी पुन्हा खासदार डॉ. विखे यांची भेट घेतली. आनंदाने आजीबाईंनी विखेंना मिठी मारली. जवळ घेत फोटोही काढून घेतला. गोरगरिबांसाठी असेच कार्य करत राहा, असा आशीर्वाद देत आजीबाई आपले पुढील आयुष्य जगण्यासाठी घरी परतल्या. त्यांचा मुलगा अंकुश बर्डे यांनी सांगितले की, ‘आईची सुरवातीची परिस्थिती पाहून आम्ही खूप घाबरलो होतो. त्यामुळे धावतच धावून डॉ. विखेंची भेट घेतली. त्यांनी तातडीने हालचाली केल्याने आणि नंतर योग्य उपचार मिळाल्याने आमची आई वाचली’.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times