अहमदनगर: जमिनीच्या पैशाच्या वादातून तालुक्यातील एक भाचा आपल्या मामाला रस्तालुटीच्या गुन्ह्यात अडकविण्यास गेला. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी सुरू केली. मामीचा जबाब नोंदविला असता भाच्याने रचलेला बनाव उघडकीस आला. आपण अडकत आहोत, हे लक्षात येताच भाच्याने पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी धूम ठोकली.

श्रोगोंदा तालुक्यातील घोडगाव येथील सागर शंकर निंबोरे (वय ३०) हा पोलिस ठाण्यात २७ मे च्या रात्री फिर्याद द्यायला आला. कर्जत तालुक्यात दुरगाव फाटा येथे दुचाकीवर आलेल्या दोघांनी आपल्याला अडवून मारहाण केली आणि आपल्याकडील मोबाईल व एक लाख रुपये चोरून नेले, अशी तक्रार केली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निंबोरे याच्या तक्रारीचा आणि वर्तनाचा संशय आला. त्यामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचना देऊन या गुन्ह्याची सर्व बाजूंनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस पथक घटनास्थळी जाऊन आले. मात्र, तेथे फारसे काही हाती लागले नाही. त्यामुळे श्रीगोंदा पोलिसांकडून निंबोरे याची माहिती मिळविण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविण्यात आली. निंबोरे याच्याविरुद्ध खुनासह दरोडा, फसवणूक, चोरी असे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. तक्रार देताना निंबोरे त्याचे मामा गोरख नभाजी दरेकर यांच्यावर संशय असल्याचे नोंदवून घ्या, असे वारंवार सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी मामाच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे ठरविले.

वाचा:

पोलिस निंबोरे याला घेऊन त्याच्या मामाच्या घरी म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे गेले. तेथे मामी नंदाबाई दरेकर भेटल्या. त्यांनी वेगळीच माहिती दिली. निंबोरे हा २५ मे रोजी दरेकर यांच्या घरी आला होता त्याने दरेकर यांचा गतीमंद मुलगा दीपक याला मोबाईल चोरीचा आळ घेऊन मारहाण केली होती. त्याच्या जखमाही त्यांनी पोलिसांना दाखविल्या. मोबाईलसाठी निंबोरे याने घराची झडती घेतल्याचेही सांगितले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर समजले की त्याचे मामा-मामी शेताच्या वाट्याचे पैसे देत नाहीत, याचा राग त्याला होता. त्याच रागातून त्याने मामाला अडकविण्याचा प्रयत्न केला. ही चौकशी सुरू असताना आता आपले बिंग फुटले, हे लक्षात आल्यावर निंबोरे याने तेथूनच धूम ठोकली. पोलिसांनी त्याच्याविरुद्धच बनाव रचून पोलिसांना कामाला लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

असा रचला बनाव

रस्ता लुटीची फिर्याद देण्यास जाण्यापूर्वी ती खरी वाटावी यासाठी निंबोरे याने बँकेतून पैसे काढले. म्हणजे हे पैसे चोरी गेल्याचे सांगता येईल. प्रत्यक्षात हे पैसे त्याने एका नातेवाईकाकडे ठेवले होते. मोबाईलमुळे तपास होऊन मामा पकडला जावा, यासाठी बनाव रचण्यापूर्वी मामाच्या घरी जाऊन त्याने आपल्याकडील मोबाईल मामाच्या घरी गुपचूप ठेवला होता. त्यामुळे चोरांनी मोबाईल नेल्याची थाप पचावी आणि नंतर तो मामाच्या घरी आढळून यावा, असा बनाव त्याने रचला होता. मात्र, पोलिसांना संशय आला आणि मामीने दिलेल्या जबाबामुळे निंबोरे याचे बिंग फुटले.
आता तोच गुन्ह्यात अडकला आहे. पोलिसांनीच त्याच्याविरुद्ध लुटीचा बनाव करून खोटी तक्रार दिली. नातेवाईकांना त्रास होईल अशी द्वेषभावना मानात ठेवून पोलिसांना खोटी माहिती दिली. खोटा पुरावा तयार केला, तसेच पोलीस यंत्रणेचा वेळ व महाराष्ट्र शासनाची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, असे आरोप लावले आहेत. पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर यांच्याकडे तपास सोपविण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here