सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाला उपस्थिती लावत आज देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री आज नाणार विषयी काही भाष्य करतील, अशी अपेक्षा होती पण मुख्यमंत्री काहीही न बोलता सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीसाठी निघून गेले.

भराडी देवीची यात्रा मोठ्या दिमाखात सुरू झाली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेला आले आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून ९ रांगा तयार करण्यात आल्या असून पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे. अनेक मान्यवर व्यक्तींची यात्रेला उपस्थिती आहे. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचा सत्कार स्वीकारून मुख्यमंत्री जिल्हा आढावा बैठकीला निघाले. उद्योग मंत्री सुभाष देसाई, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे त्यांच्या समवेत होते.

नाणारला शिवसेनेचा विरोधच

आजच्या दौऱ्यात नाणार रिफायनरी समर्थक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही. सुभाष देसाई यांनी शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत आमचा रिफायनरीला विरोध असल्याचे सांगितले.

शिवसेनेच्या माजी आमदाराकडून समर्थन

शिवसेनेचेच काही पदाधिकारी नाणार रिफायनरीचे समर्थन करीत आहेत. राजापूरचे माजी आमदार गणपत कदम आणि एका जिल्हा परिषद सदस्यांने प्रकल्पाचे समर्थन केले आहे. त्यामुळे चर्चेला तोंड फुटले आहे. दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आता भाजपच्या जवळ येऊ पाहत आहे, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे जिल्ह्याचा कमी झालेला विकास निधी परत देणार आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी नव्हती तेव्हा ठीक होते, आता सत्ताधीश झाल्यामुळे बेरोजगारांना काय उत्तर देणार, हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला आहे. म्हणून आता त्यांनी रिफायनरी वरून यू-टर्नची सुरुवात केली आहे. त्यांच्या वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्यांनी एकप्रकारे जनमत चाचणी घ्यायला सुरुवात केली आहे. बेरोजगारांना उत्तर द्यायचं आहे तेव्हा हा प्रकल्प करावाच लागेल, असे वक्तव्य नाणार प्रकल्पाला सर्वाधिक राजकीय बळ दिलेले भाजपचे नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here