शहरातील डीएसपी चौक ते बुऱ्हाणनगर रोड चौक या भिंगार कँटोन्मेंट हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याला पॉटींजर रोड असे नाव जुन्या काळापासून आहे. पॉटींजर नावाचे एक ब्रिटिश अधिकारी होते. त्यांच्याकडे प्रशासन आणि लष्करी जबाबदारीही होती. त्यामुळे लष्करी हद्दीतील या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले होते. डीएसपी चौक, नवीन जिल्हा न्यायालयाची इमारत, गोविंदपुरा चौक ते बुऱ्हाणनगर रोडचा चौक येथून हा रस्ता भिंगारजवळ नगर-पाथर्डी रोडला मिळतो. या रस्त्यावर लष्करी अधिकाऱ्यांचे जुने बंगले आहेत. अलीकडेच काही नव्या इमारतींची उभारणीही सुरू आहे.
गुगल मॅपवर मात्र या रस्त्याला औरंगजेब रोड असे नाव दिसते. ते कसे, आले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाचा:
इतिहासातील संदर्भ पाहिले असता नगरचा भुईकोट किल्ला ताब्यात घेण्यासाठी औरंगजेबाने त्या काळी अटोकाट प्रयत्न केले. दख्खनच्या मोहिमेवर असताना औरंगजेब १६८३ मध्ये नगरला आला, तेव्हा मोगल सैन्याची पाच लाखांची छावणी भिंगारपासून चार मैल अंतरापर्यंत पसरली होती. परतीच्या प्रवासात १७०७ मध्ये त्याचा अहमदनगरमध्येच मृत्यू झाला. ते ठिकाण या रस्त्यापासून जवळच आहे. असे असले तरीही कोणत्याही यंत्रणेने, संघटनेने या रस्त्याला औरंगजेबाचे नाव कधीच दिलेले नाही. तरीही गुगल मॅपवर या रस्त्याला ‘औरंगजेब रोड’ असे नाव दर्शविण्यात येत आहे. ज्या भागात औरंगजेबाचा मुक्काम होता, त्याला पूर्वीच अलमगीर असे नाव देण्यात आलेले असून ते वापरातही आहे.
वाचा:
मिळालेल्या माहितीनुसार सरकारी, अधिकृत नावांसोबतच लोकांनी पोस्ट केलेल्या नावांचाही समावेश करते. एखादी गोष्ट अनेकांनी नमूद केली की ती गुगलकडून स्वीकारली जाते, तसेच अनेकांनी हरकत घेतली तर ती बदललीही जाते, असे सांगण्यात येते. त्यामुळे या रस्त्याचे औरंगजेब रोड हे नामकरण गुगलने कशाच्या आधारे केले असावे, हा प्रश्नच आहे. हा भाग भिंगार लष्करी छावणी परिषदेच्या हद्दीत येतो. लष्करी हद्दीतील गोपनीयतेसह सुरक्षा विषयक नियम या भागात लागू आहेत. गुगल मॅपच्या आधारे कोणी या भागात आले तर त्याची गफलत होण्याची शक्यता आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times