मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतल्या भेटीनंतर खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्री लायक असते तर त्यांना दिल्लीत जाण्याची वेळ आली नसती. आई-वडील कधीही आपल्या मुलांसाठी रडत नाही, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक विषयांवर मोदींना भेटायचं होतं. त्यामुळे त्यांनी ही संधी साधली असंही यावेळी नवनीत राणा म्हणाल्या. मंगळवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावरूनही त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं. तसंच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं राणा यांची खासदारकी धोक्यात आली असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. यावर पत्रकार परिषद घेत नवनीत राणा यांनी मोठा खुलासा केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश मी अद्याप वाचला नाही. पण यामध्ये पॉलिटिकल खिचडी शिजली असल्याचा धक्कादायक आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. कारण, अचानक कोर्टाचा असा निर्णय येणं म्हणजे कुठेतरी राजकीय खिचडी शिजली हे नक्की असं नवणीत राणा यांनी म्हटलं आहे.

गेली ९ वर्ष मी हा लढा लढत आहे. यामध्ये कोणी राजकारण केलं हे मला सांगण्याची गरज नाही. पण माझा आणि शिवसेनाचा हा वाद सगळ्यांनाच माहिती असल्याचं नवणीत राणा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर न्याय मागण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात जाईन. मला न्यायावर विश्वास आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here