मुंबईः मान्सून मुंबईत दाखल होताच पहिल्या पावसात मुंबईतील सखल परिसरात पाणी साचलं आहे. मुंबईत पाणी तुंबल्यानं विरोधकांनी महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर, पहिल्याच पावसात मुंबई का तुंबली असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मुंबई महापालिकेचं आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबईत आज सकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली. मुंबईसह उपनगरातही पावसानं नागरिकांची दाणादाण उडवली आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे तर, रेल्वे व रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी हिंदमाता परिसराची व तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमासोबत संवाद साधला आहे.

‘मुंबईत आतापर्यंत १४० ते १६० मिमि पाऊस, झाला आहे. तसंच, अवघ्या तासाभरात ६० मिमि पाऊस झाला आहे. साधारणपणे २४ तासात १६५ मिमि पाऊस झाला तर अतिवृष्टी होते. एकट्या सायन- दादरमध्ये १५५ मिमि पाऊस झाला, म्हणून मुंबईत पाणी तुंबले, असं इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, आपल्याकडे ड्रेनेजची क्षमता कमी असल्यानं काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘हिंदमातामध्ये वर्षानुवर्ष वाहतुक कोंडी होत होती. मात्र, यावेळी हिंदमाता परिसरात अडीच फुटापर्यंत पाणी साचूनही वाहतूक कोंडी झाली नाही. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच वाहतूक कोंडी झाली नाही. आता साडेतीन फुटापर्यंत पाणी साचले तरीही हिंदमातामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही,’ असा विश्वास इक्बाल चहल यांनी व्यक्त केला आहे.

महापौर काय म्हणाल्या?

मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा आम्ही केलाच नव्हता. पण चार तासांच्या आत पाण्याचा निचरा झाला नाही तर मात्र विरोधकांचा आरोप योग्य आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here