पुण्यातील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांना वाघाची प्रतिकृती भेट देण्यात आली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘पंतप्रधान यांच्याशी उद्धव ठाकरेंचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण चंद्रकांत पाटील आणि फडणवीस यांच्याशी त्यांचं जमत नाही. ते कशामुळे हे त्यांनाच माहीत. मात्र आमची वाघाशी दुष्मनी कधीही नव्हती. आताही नरेंद्र मोदी यांनी वाघासोबत दोस्ती करण्याच्या सूचना केल्या तर, त्यांचा आदेश हा आमच्यासाठी आज्ञा आहे, त्यामुळे आम्ही तेही करू.’
दरम्यान, राजकीय समीकरणे बदलली तर शिवसेनेसोबतही आगामी काळात युती होऊ शकते याचेच संकेत चंद्रकांत पाटील यांनी तर दिले नाहीत ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. मात्र आगामी काळात निवडणुका झाल्या तर त्या वेगळ्याच लढवल्या जातीत, असं सांगायलाही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.
मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर घणाघात
चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्य सरकारने पुन्हा मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. आरक्षण हा केंद्राकडे किंवा मोदी जी यांच्याकडे मांडण्याचा मुद्दा नाही. देवेंद्र फडणवीसजी यांनी फार मेहनतीने गायकवाड समिती नेमून मराठा समाजाला मागास ठरवले होते. ज्या भोसलेजी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती नेमली आहे, त्यांनीही देवेंद्र फडणवीसजी यांनी मराठा तरुणांना दिलेल्या सवलती राज्य सरकारनेही देण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे. सवलती देण्यापासून राज्य सरकारला कोणीही अडवले नाही,’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times