बारामतीः बारामतीतील एका चहावाल्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाढी करण्यासाठी १०० रुपयांची मनी ऑर्डर पाठवली आहे. लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दाढी हा चर्चेचा विषय ठरली होती. सोशल मीडियावरही यावरुन तुफान चर्चा रंगली होती. मात्र, बारामतीतील एका चहावाल्यानं थेट मोदींच्या दाढीवर आक्षेप घेतला आहे.

अनिल मोरे असं या व्यक्तीचं नाव आहे. लॉकडाऊनमुळं अनेकांचं काम ठप्प झालं आहे, तर रोजगार बंद झाला आहे. त्यामुळं अनिल मोरे यांनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत त्यांना पत्रही लिहलं आहे. ‘देश करोनासारख्या महामारीसोबत लढत आहे. देशात करोना लसीकरण केंद्र, आरोग्य सुविधा वाढवायला हवेत. अशावेळी तुम्ही दाढी वाढवून काय सिद्ध करु इच्छिता, जर तुम्हाला काही वाढवायचे असेल तर रोजगार वाढवा,’ असं मोरे यांनी म्हटलं आहे.

अनिल यांची बारामतीतील खासगी रुग्णालयाच्या बाहेर चहाची टपरी आहे. लॉकडाऊनमुळं गेल्या दीड वर्षापासून त्यांचं काम बंद आहे. त्यामुळं त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहलं आहे. ‘पंतप्रधान देशातील सर्वोच्च नेता आहेत. त्यांच्याबद्दल माझ्यामनात आदर आहेच. त्यांना त्रास देणं माझा उद्देश नाही. पण लॉकडाऊनमुळं लाखो लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,’ असंही मोरेंनी पत्रात लिहलं आहे. तसंच, ‘करोनामुळं मृत्यू झालेल्या वारसांना पाच लाखांची मदत देण्याची मागणी केली आहे.

तुम्ही चहावाले होते आणि मी देखील चहावाला आहे. यामुळं मी माझ्या मेहनतीच्या कमाईतून १०० रुपये दाढी करण्यासाठी पाठवत आहे, असंही मोरे यांनी पत्रात लिहलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here