पुणे : ‘पुणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे शहर आहे. गेल्या २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीचा अपवाद वगळता पक्षाच्या स्थापनेपासून शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा आलेख उंचावताच राहिला आहे. अजित पवार ज्या-ज्या वेळी पुण्याचे पालकमंत्री राहिले आहेत. तेव्हा महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी राहिला आहे. सध्याही अजितदादा पालकमंत्री असून, कोणत्याही परिस्थितीत २०२२ च्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असेल’ असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी गुरुवारी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी, दहा जून रोजी पक्ष कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात जगताप बोलत होते. या वेळी खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे नेते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक बाबुराव चांदेरे, दीपक मानकर, पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मनोगत व्यक्त करताना प्रशांत जगताप यांनी सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या व पुण्याच्या विकासातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगदानाचा आढावा घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत आपले श्रद्धास्थान शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने देदीप्यमान यश मिळवलं आहे. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत पुणेकर जनतेने आपल्याविरोधात कौल दिला. सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर करण्यात आला. पक्षाचे काही सदस्य फोडण्यात आले. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या. ही आपल्यासाठी जमेचीच बाजू होती. मात्र, पुणेकरांचा हा कौल मान्य करून एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून पुणेकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कार्यरत आहे, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘आता पुढील वर्षी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यानंतर दोनच वर्षांत लोकसभा व विधानसभेची निवडणूक होत आहे. आता पुढील वर्षी होणारी महानगरपालिकेची निवडणूक हे आपले लक्ष्य आहे. पुणे शहराच्या विकासात शरद पवार साहेबांचे मोठे योगदान आहे. आपल्या पक्षाबद्दल पुणेकरांच्या मनात ठाम विश्वास आहे. त्यादृष्टीने आपण सर्वजण जोमाने कामाला लागूयात. भाजपच्या चुकीच्या बाबींवर बोट ठेवत आपण आपले काम जनतेपर्यंत पोचविल्यास आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा निर्धार प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांनी शहरासाठी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. आयटी पार्क पासून इतर सर्व गोष्टी आहेत. पुणे शहराच्या परिवर्तनात पवार साहेबांची भूमिका महत्वाची आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील वेळोवेळी पुणे शहराच्या विकासासाठी विशेष लक्ष घातले आहे. केंद्र व राज्याच्या माध्यमातून वेळोवेळी पुणे शहराच्या विकासासाठी मदत केली आहे. हे सर्व पुणेकारांना ज्ञात आहे.

गिरे कुटुंबियांचे आभार

‘येत्या २० तारखेपर्यंत आपण नव्या पक्ष कार्यालयात स्थलांतरित होणार आहोत. मागील १८ वर्षांपासून गिरे कुटुंबीयांनी विनामूल्य पक्ष कार्यालय उपलब्ध करून दिले. प्रसंगी विजेचे बिलही त्यांनीच भरले आहे. याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गिरे कुटुंबाचे आभार मानतो,’ अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी गिरे कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here