ई-कॉमर्स साइटवरून ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याचबरोबर ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. एका २५ वर्षीय तरुणीलाही ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही तरूणी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १७ डिसेंबरला तरुणीनं एका ई-कॉमर्स साइटच्या अॅपवरून नेलपॉलिश मागवली होतं. त्यासाठी तिनं खासगी बँक खात्यातून ३८८ रुपयांचे पेमेंटही केलं होतं. ठरलेल्या तारखेला या तरुणीनं मागवलेली नेलपॉलिश मिळाली नाही. विलंब झाला म्हणून तिनं वेबसाइटच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. त्यावेळी पेमेंट मिळालं नाही असं समोरून सांगितलं गेलं. त्यानंतर पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं आणि तिच्याकडून मोबाइल क्रमांक मागितला.
काही वेळातच तिच्या दोन बँक खात्यातून ९०, ८४६ रुपयांचे पाच ट्रान्झॅक्शन झाले. तर एका सार्वजनिक बँक खात्यातून १५०० रुपयेही काढण्यात आले. हे पैसे तिच्या बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात वळवण्यात आले. फोनवरून आपण बँक खात्याबाबतची कोणतीही माहिती दिली नव्हती, असं या तरुणीनं पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी तिनं वाकड पोलिसांत तक्रार दाखल केली असून, तपास करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times