अदानी विल्मर ही खाद्यतेल आणि विविध खाद्य वस्तूंची उत्पादन करणारी कंपनी आहे. फॉर्च्युन या ब्रँड नावाने कंपनीचे खाद्यतेल आहे. अदानी विल्मरने २०२७ पर्यंत देशातील सर्वात मोठी खाद्य वस्तू उत्पादक कंपनी बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी कंपनीने जोरदार तयारी केली आहे. समभाग विक्रीतून ७००० ते ७५००० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कंपनीची योजना सफल झाली तर अदानी विल्मर ही भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारी अदानी समूहातील सातवी कंपनी ठरणार आहे. अदानी समूहातील ६ कंपन्यांपैकी ५ कंपन्यांचे बाजार भांडवल एक लाख कोटींहून अधिक आहे.
अदानी विल्मर हा अदानी समूह आणि सिंगापूरमधील विल्मर कंपनीचा संयुक्त उद्यम आहे. अदानी विल्मरची स्थापना १९९९ मध्ये झाली. कंपनीकडून खाद्य तेल, बासमती तांदूळ, आटा, मैदा, रवा, डाळ , बेसन यासारख्या खाद्य वस्तूंची निर्मिती केली जाते. करोना संकटात खाद्य तेलाचा भाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे खाद्य तेल क्षेत्रातील सर्वच कंपन्यांना मोठ फायदा झाला आहे. देशातील आघाडीच्या तेल उत्पादकांचा विचार केला तर देशात अदानी विल्मरची वितरण व्यवस्था मोठी आहे.
नुकताच अदानी समूहातील सहा सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १०० अब्ज डॉलरवर गेले. अशा प्रकारची कामगिरी करणारा अदानी समूह तिसरा उद्योग समूह ठरला आहे. यापूर्वी टाटा समूह आणि रिलायन्स ग्रुपला अशी कामगिरी करता आली आहे. अदानी समूहातील सूचिबद्ध कंपन्यांमध्ये अदानी एन्टरप्राइसेस , अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन , अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जी या सहा कंपन्यांचा समावेश आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times