: कोविड संसर्गाचा वेग मंदावल्याने जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असताना करोना पश्चात उद्भवत असलेल्या म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचं सावट मात्र अद्याप कायम आहे. विभागात नव्याने २३ जणांना या बुरशीने वेढा घातला आहे, तर उपचारादरम्यान ३ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.

करोनाची साखळी मोडून काढण्यात यशस्वी झालेल्या विभागात आतापर्यंत १५९४ जणांना या बुरशीने ग्रासल्याचे निदान झाले आहे. त्यातील १३५ जणांना या बुरशीमुळे प्रकृती खालावल्याने प्राण गमवावे लागले आहेत. ब्लॅक फंगसचा विळखा पडलेल्यांमध्ये ७१ टक्के म्हणजे तब्बल ११३६ रुग्ण हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. नागपूर खालोखाल वर्धा जिल्ह्यात १०७, चंद्रपूर जिल्ह्यात ९१, गोंदिया जिल्ह्यात ४४, तर भंडारा जिल्ह्यात १७ जणांना या आजाराची बाधा झाली आहे.

या आजारामुळे दगावलेल्या १३५ जणांमध्येही सर्वाधिक १२५ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातून नोंदवले गेले आहेत. विभागात गुरुवारी उपचारादरम्यान निधन झालेल्या ३ जणांपैकी २ नागपूर आणि १ चंद्रपूरचा रहिवासी आहे. या आजाराची लागण झालेल्यांपैकी १०९३ जणांवर विविध प्रकारच्या शल्यक्रिया झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर आलेल्या बुरशीवर नियंत्रण मिळाल्याने ८०५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले.

करोनाबाबत नागपूर जिल्ह्याला दिलासा!
कोविड संसर्गाच्या उद्रेकातून सुटका होत असलेल्या नागपूर जिल्ह्याला सलग सातव्या दिवशी गुरुवारी पुन्हा एकदा दिलासा मिळाला. नव्याने आजाराचे निदान होणाऱ्यांची संख्या संशयितांच्या सरासरीने ०.८४ टक्क्यांवर घसरली. आज तपासलेल्या १० हजार ७९५ नमुन्यांमध्ये ९१ जणांना नव्याने करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले.

दुसऱ्या बाजूला जिल्हयात उपचार घेत असलेले ४०१ जण आजारमुक्त झाल्याची नोंद घेतली गेली. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्ण संख्याही ३ हजाराच्या खाली म्हणजेच २३९६ इतकी नोंदविली गेली. पण दुर्दैवाने आजही १० करोनाबाधितांचा मृत्यू झाला.

चाचण्याही आल्या निम्म्यावर
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर जिल्ह्यातील संशयितांच्या चाचण्यांची दैनिक संख्या २० ते २५ हजारांपर्यंत गेली होती. ही संख्यादेखील आता जवळजवळ निम्म्यावर आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here