म. टा. खास प्रतिनिधी

: गरजेच्या वेळी गैरसोय होऊ नये यासाठी कार्यालयात चेकवर सही करून ठेवणे दक्षिण मुंबईतील एका कंपनीच्या संचालकांच्या अंगाशी आले आहे. १३ चेक चोरुन आणि एका चेकवरील स्वाक्षरीनुसार बनावाट स्वाक्षरी करून कंपनीच्या खात्यामधून तब्बल २० लाख रुपये काढण्यात आले आहेत. हा प्रकार लक्षात येताच संचालकांनी चेक चोरून हेराफेरी करणाऱ्यांविरुद्ध व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

मुंबई महापालिकेतील एका कंत्राटदाराने पत्नी, भावाची पत्नी आणि इतर अशा पाच संचालकांच्या नावाने एक कंपनी सुरू केली. ही कंपनी वेगवेगळ्या राज्यातील पालिकांकडून कचरा उचलण्याचे कंत्राट घेते. कंपनीच्या मुंबईसह सूरत, मिरा-भाईंदर, पुणे, अहमदाबाद, जुनागढ व उज्जैन या ठिकाणी शाखा आहेत. मुंबई येथील कार्यालयात सुमारे २३ कर्मचारी कार्यरत आहे. सध्या करोनाचा संसर्ग असल्याने संचालक नियमित कार्यालयात येत नसल्याने काही चेक सही करून मुंबईतील कार्यालयात ठेवण्यात आले होते. कंपनीशी संबंधित वेगवेगळ्या लोकांना देण्यासाठी या चेकचा वापर करण्यात येणार होता. याचदरम्यान बँक खात्याचा तपशील पाहिला असता खात्यामधून १९ लाख ८० हजार रुपये परस्पर एका खात्यावर वळविण्यात आल्याचे दिसून आले. बँकेमार्फत पैसे ट्रान्सफर केलेल्या खात्याची माहिती घेतली असता असे कोणतेही खाते कंपनीशी संबंधित लोकांचे नसल्याचे निदर्शनास आले.

कंपनी मालक आणि संचालकांच्या ही बाब लक्षात येतच बँकेत जाऊन चेक आणि एनइएफटीसाठी भरलेली पावती पाहिली असता यामध्ये कंपनीचा रबरी शिक्का मारल्याचे दिसून आले. यावरून कंपनीतील कुणाचा तरी यामध्ये हात असल्याचा संशय संचालकांना आहे. कार्यालयात जाऊन इतर चेकची तपासणी केली असता, एकूण १३ चेक गायब असल्याचे आढळले. मुंबई कार्यालयातील २३ पैकी १० कर्मचारी हे अकाऊंट्स विभागातील असल्याने त्यांच्यावर संशयाची सुई अधिक असल्याचे संचालकांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून व्ही. पी. रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here