सिंधुदुर्ग: आंगणेवाडीतील भराडी देवी यात्रोत्सवासह अन्य कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. या धावत्या दौऱ्यावर माजी मुख्यमंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी कडाडून टीका केली आहे.

नारायण राणे यांनी आज सपत्नीक भराडी देवीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत आमदार नितेश राणे आणि जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर होते. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भराडी देवीचं दर्शन व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार स्वीकारून लगेचच जिल्हा मुख्यालयाच्या दिशेने रवाना झाले होते. त्यावरच बोट ठेवत राणे यांनी टीकास्त्र सोडले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवीसाठी वेळ देऊ शकत नाहीत तर लोकांना काय देणार?, असा सवाल राणे यांनी केला.

मुख्यमंत्री कोकणात कोणत्या कामासाठी आले होते ते माहित नाही पण एखाद्या ठिकाणी गेल्यावर मुख्यमंत्री तिथे काही ना काही देऊन जातात, ही खरंतर महाराष्ट्राची परंपरा बनली आहे. या मुख्यमंत्र्यांनी मात्र तसे काहीच केले नाही. मुख्यमंत्री येथे आले आणि येथून न बोलताच जाणे त्यांनी पसंत केले, असे सांगत राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा मुख्यालयात फक्त दोन मंत्र्यांची मिनी कॅबिनेट घेतली. अशा कॅबिनेटमधून हे मुख्यमंत्री जिल्ह्याचा काय विकास करणार आणि जिल्ह्याला किती निधी देणार?, अशा प्रश्नांची सरबत्तीही राणे यांनी केली.

मी मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याला भरघोस निधी दिला होता. आज एकूणच आपलं राज्य अधोगतीकडे चाललं आहे. निवडणुकीत दिलेले शब्द पाळले गेले नाहीत. सरकार आले तेव्हा एकदा निराशा झाली आणि आजच्या या दौऱ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची निराशा केली, असेही राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे नाणारबाबत मौन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाला उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री दर्शनानंतर नाणार विषयी काही भाष्य करतील, अशी अपेक्षा होती पण मुख्यमंत्री काहीही न बोलता सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीसाठी निघून गेले.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here