मुंबई: संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता लक्षात घेऊन राज्यात टप्प्याटप्प्यानं अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्या निर्णयानंतर आज प्रथमच राज्य सरकारनं करोना पॉझिटिव्हिटीची जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, मुंबईसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळं मुंबईसह बहुतेक जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (: State Government releases data on Corona Positivity)

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्यानं आज करोनाच्या स्थितीची १० जूनपर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात करोनाचा जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेची माहिती आहे. त्यानुसार, मुंबई व उपनगर जिल्ह्यांसह नगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदूरबार, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील करोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. तसंच, मुंबई वगळता बहुतेक जिल्ह्यात ७५ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड रिकामे झाले आहेत. या आकडेवारीच्या आधारे संबंधित जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी येत्या सोमवारपासून (१४ जून) निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

वाचा:

मुंबईतील करोना संसर्गाचा दर कमी झाला असला तरी अद्यापही २७.१२ टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले आहेत. तर, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ६७.४१ टक्के ऑक्सिजन बेड सध्या फुल्ल आहेत. सातारा जिल्ह्यात ४१.०६ टक्के तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५१.५९ टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले आहेत. या जिल्ह्यातील करोना संसर्गाचा दर अनुक्रमे १५.८५, ११.३० आणि ११.८९ इतका आहे.

वाचा:

लोकल ट्रेन सुरू होणार का?

मुंबईतील करोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या खाली आल्यानं मुंबई लोकल ट्रेन सुरू होणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. लोकल बंद असल्याचा मोठा परिणाम मुंबईतील अर्थव्यवस्थेवर व सर्वसामान्यांच्या रोजगारावर झाला आहे. त्यामुळं १४ जून रोजी नेमका काय निर्णय घेतला जाणार याविषयी मुंबईकरांना उत्सुकता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here