: महसूल विभागातील भ्रष्टाचाराची नेहमीच राज्यभर चर्चा होत असते. अशातच आता आर्थिक व्यवहाराच्या तक्रारीनंतर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना राज्य शासनाने तडकाफडकी निलंबित केलं आहे. शासनाच्या या कारवाईनंतर महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. महसूल आणि वन विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी शिंदे यांच्या निलंबनाचा आदेश काढला असून हा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे.

प्रांताधिकारी शिंदे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे केल्या होत्या. शिवाय या तक्रारीसोबत आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भातील एक ध्वनीफितही सादर करण्यात आली होती. या ध्वनीफितीतील आर्थिक देवाणघेवाणीचे संभाषण हे गंभीर स्वरूपाचे असल्याने शासनाने शिंदे यांची विभागीय चौकशी करण्याचे ठरवलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रांताधिकारी शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

शिंदे यांची वादग्रस्त कारकीर्द
प्रांताधिकारी शिंदे यांच्याविरूद्ध नागरिकांच्याही मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. प्रांताधिकारी पदाचा कार्यभार असताना त्यांच्याकडे भूसंपादनाचीही अतिरिक्त जबाबदारी होती. त्याशिवाय प्रांताधिकारीपदाचा कार्यभार घेण्यापूर्वी ते पूर्णवेळ भूसंपादन अधिकारी म्हणून काम पाहत होते. भूसंपादन कामातही त्यांच्याविषयी अनेक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. एवढंच नाही तर शिंदे हे शासकीय वाहनाऐवजी खासगी वाहन वापरत होते. त्या वाहनावर आरटीओ किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता निळा दिवा ते वापरत होते.

या वाहनावर चालकही खासगीच होता. सरकारी सेवेतील चालक नाकारुन खासगी चालक ठेवण्याचं कारण गुलदस्त्यात होतं. आता निलंबनानंतर त्यांच्या या सर्व कारभाराची चौकशी होणार आहे.

दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here