म. टा. विशेष प्रतिनिधी,
मुंबईत गेले २-३ दिवस कोसळत असलेल्या पावसाच्या सरी उद्या, रविवारी अधिक तीव्रतेने बरसतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे मुंबईत रविवारी रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या पश्चिमेकडील प्रवासाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबई, ठाणे यासह रायगड, रत्नागिरीला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या काळात पश्चिम किनारपट्टीवर अतितीव्र मुसळधार पडू शकेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी याची तीव्रता वाढून मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये तसेच, विदर्भाच्या काही भागांमध्येही पावसाची तीव्रता वाढू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारीही मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडला. या पावासाच्या सरींची तीव्रता काही काळासाठी वाढून नंतर उपनगरांमध्ये पुन्हा संततधार सुरू राहिली.

शुक्रवारी मुंबईच्या तुरळक भागांमध्ये तसेच, ठाण्यात काही ठिकाणी सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंतच्या १२ तासांमध्ये ५० ते ६० मिलीमीटरहून अधिक पाऊस स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर मोजला गेला. सर्वाधिक पाऊस प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर येथील केंद्राजवळ १२ तासांमध्ये ७१.६१ मिलीमीटर मोजला गेला. त्या मानाने शहरामध्ये पावसाचे प्रमाण दिवसभरात फारसे नव्हते. मात्र उष्णतेमुळे ढगनिर्मिती होऊन संध्याकाळनंतर मेघगर्जनेचे प्रमाणही वाढल्याचे नागिरकांनी सांगितले. मुंबईमध्ये आज, शनिवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून रविवारी त्याची तीव्रता वाढेल. मुंबईसाठी सध्याच्या पूर्वानुमानानुसार मंगळवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट म्हणजे तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत ३०.४ तर सांताक्रूझ येथे ३०.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरामध्ये तसेच, वांद्रेपर्यंत दिवसभरात फारसा पाऊस पडला नाही. मात्र कल्याण-डोंबिवली पट्टा, ठाणे आणि मालाडपासून पुढील परिसरातील नागरिकांनी याचा अनुभव घेतला. पुढील ४ दिवस केवळ उपनगरेच नाहीत तर पश्चिम किनारपट्टीवर ही परिस्थिती कायम असेल, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

रायगड, रत्नागिरीलादेखील रेड अॅलर्ट

येत्या ४ दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहतील. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांमध्ये या काळात मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडेल. रायगड आणि रत्नागिरीला शनिवारी आणि रविवार या दोन्ही दिवशी रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या ४ ते ५ दिवसांमध्ये पावसाची तीव्रता रोज वाढू शकते. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here