म. टा. प्रतिनिधी, नगर: कर्जत तालुक्यात राक्षसवाडी नावाच्या गावात एक व्यक्ती अशरक्ष: राक्षसासारखीच वागत इतरांना त्रास देत असे. मद्यपान करून गावात गोंधळ घालणे, हातात शस्त्र घेऊ ते मिरवत दहशत पसरविणे, विनाकारण लोकांच्या अंगावर धावून जाणे, कोणाच्या घरात घुसून लोकांना मारहाण करणे असे ‘राक्षसी’ कृत्य दारूच्या नशेत ही व्यक्ती करीत होती. शेवटी ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले आणि पोलिसांनी त्याचा ‘बंदोबस्त’ केला.

राक्षसवाडी बुद्रुक गावातील विकास दिलीप शिंदे (वय २४ वर्ष) याला कर्जत पोलिसांनी अटक केली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा खटला भरून तो न्यायालयात पाठविण्यात आला. न्यायालयाने त्याला चौदा दिवस प्रतिबंधात्मक कारवाईखाली कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. किमान चौदा दिवस तरी तो गावाबाहेर राहणार असून तेथून बाहेर येताना सुधारणा होईल, अशी पोलिस आणि ग्रामस्थांना आशा आहे.

शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून गावातील लोकांना अशा पद्धतीने त्रास देत होता. मात्र, तक्रार कोणी करायची? कारवाई होणार का? तक्रार देणाऱ्यालाच पुढे त्रास होणार का? असे प्रश्न असल्याने ग्रामस्थ तक्रार करीत नव्हते. त्यामुळे आरोपीचे धाडस वाढत गेले. आपले कोणीच काही करू शकत नाही, हे लक्षात आल्याने त्याने जास्तच त्रास देण्यास सुरवात केली.

पोलिस निरीक्षक यादव यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी या तरुणाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याविरूद्ध नेहमीच्या पद्धतीने कारवाई करायची ठरली तर कोणातरी गावकऱ्याची फिर्याद घ्यावी लागणार, त्यासाठी कोणी तयार होत नव्हते. शिवाय गुन्ह्याच्या स्वरूपानुसार तो काही दिवसांतच जामिनावर सुटला असता. नंतर सर्वांनाच न्यायालयाच्या चकरा माराव्या लागल्या असत्या. त्यामुळे यादव यांनी त्याला अद्दल घडविण्यासाठी आणि त्यातून सुधारण्याची संधीही देण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आरोपीला एकाच दिवसाच्या सुनावणीनंतर १४ दिवसांची कोठडी देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. त्या आधारे पोलिसांनी खटला पाठविला. न्यायालयात तो मंजूरही झाला आणि शिंदे याची १४ दिवसांसाठी तुरूंगात रवानगी करण्यात आली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here