उद्या, १३ जून रोजी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांडून विविध उपक्रम राबवले जातात. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. ट्टिवरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
आदित्य ठाकरेंची पोस्ट
मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. आपल्याला आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. मास्क लावणे, अंतर पाळणे, गर्दी होऊ न देणे हा या आजाराला हरवण्याचा हमखास उपाय आहे. त्यामुळेच यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत आहे, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.
माझी आपणा सर्वांना हीच विनंती आहे की कृपया कुठेही गर्दी करु नका. आपण मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये, ही नम्र विनंती. आपण प्रत्यक्ष भेटला नाहीत तरी आपणा सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील, हा विश्वासही आहे. वाढदिवसानिमित्त होर्डिंग्स, हार, केक अशा गोष्टींवर खर्च करू नये, असेही मला मनापासून वाटते. त्याऐवजी कोरोनाला हरवण्यासाठीचे नियम पाळणे, इतरांना शक्य ती मदत करणे हीच वाढदिवसाची अमूल्य भेट. घरी रहा, सुरक्षित रहा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त गर्दी न करण्याचे आवाहन केलं होतं. मागील वर्षीप्रमाणे हे वर्षदेखील बिकट आहे. करोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सुटलेला नाही. लॉकडाऊन उठले असले, तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल. त्यामुळे माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा. जिथे आहात, तिथे सुरक्षित राहा. कुटुंबीय आणि आसपासच्या नागरिकांची काळजी घ्या, असं राज ठाकरेंनी पत्रकात म्हटलं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times