राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी याबाबत सविस्तर निवेदनं केलं आहे. ‘प्रशांत किशोर यांनी काल शरद पवार साहेबांची भेट घेतली. जवळपास तीन तास दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र, निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेसनं कुठलीही जबाबदारी दिलेली नाही,’ असं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचा:
‘प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. राजकारणातील घडामोडींकडं ते एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघत असतात. त्यांचा तो अनुभव त्यांनी पवार साहेबांसमोर ठेवला. देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती त्यांनी पवार साहेबांना दिली,’ असं मलिक यांनी सांगितलं.
‘देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे अशी पवार साहेबांची इच्छा आहे आणि त्यांनी ती अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार स्वत: त्या राज्यात प्रचारासाठी जाणार होते. मात्र, तब्येतीमुळं त्यांना जाता आलं नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक सक्षम आघाडी उभी करण्यासाठी प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल,’ असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशात परिवर्तन अटळ
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन करण्याचं तिथल्या जनतेनं मनाशी पक्कं केलं आहे आणि ते होणारच, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ‘केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करायचा की नाही हा अधिकार पंतप्रधानांचा आहे. तसंच, उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात बदल करायचा की नाही हा अधिकार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आहे’, असं ते म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times