खासदार संभाजीराजेंना २००९ ला राष्ट्रवादीने कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी दिली. पराभवानंतर ते पक्षापासून दुरावले. त्याचाच फायदा घेत भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी देत केवळ महाराष्ट्रात पक्षाला बहुजन चेहरा देण्याचा प्रयत्न केला. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्षपद, त्याला सहाशे कोटीचा निधी देत छत्रपती घराण्याचा सन्मान आम्ही केल्याचा प्रचारच सुरू झाला. याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपने केला, पण संभाजीराजेंनी पहिल्यापासून या पक्षाच्या एकूण सर्व प्रक्रियेपासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न केला. ‘भाजपचे खासदार’ असा शिक्का नावापुढे लागू नये याची त्यांनी पूरेपूर काळजी घेतली. त्यांचे पिता छत्रपती शाहू महाराज, बंधू मालोजीराजे हे काँग्रेसला मानणारे आहेत. त्यामुळे घरातच दोन पक्ष दिसत असले तरी पाच वर्षात भाजपचा फायदा होईल अशी कोणतीच भूमिका संभाजीराजेंनी घेतली नाही. यामुळे त्यांच्यावर पक्षात नाराजी होती, फक्त ती स्पष्टपणे बोलून दाखविण्यात आली नाही.
वाचा:
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर हा विषय घेऊन राज्यभर वातावरण तापवण्याचा भाजपचा डाव आहे. यामध्ये संभाजीराजेंनी पुढाकार घेतल्यानंतर ते आक्रमक होतील आणि त्याचा राजकीय फायदा आपल्याला होईल असे भाजपला वाटत होते. पण आक्रमक झालेल्या संभाजीराजेंनी अचानक आंदोलनाचे अनेक टप्पे पाडल्याने त्यातील हवा गेली. यामुळे भाजपचे नेते नाराज झाले. यातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच संभाजीराजेंच्या आंदोलनाविषयी संशय व्यक्त केला. सरकारला वेळ देण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचा आरोप केला. याची दखल न घेण्याची भूमिका घेत संभाजीराजेंनी प्रदेशाध्यक्षांनाच बेदखल केले. ज्यांनी खासदार करण्यात पुढाकार घेतला, त्यांनाच बेदखल केल्याने पक्षात हलकल्लोळ उडाला आहे.
वाचा:
भाजपने खासदार करूनही या पक्षाचा शिक्का आपल्यावर पडू नये म्हणून काळजी घेणारे संभाजीराजे या पक्षावर नाराज आहेत. ते आपली नाराजी विविध कृतीतून व्यक्त करत आहेत. चार पत्रे पाठवूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिला नाही. यामुळे ते नाराज झाले. ती नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यापूर्वी चाळीस वेळा भेट दिली, सन्मान दिला त्याचे काय असा सवाल प्रदेशाध्यक्षांनी केला. त्यानंतर भाजपचे खासदार असलेल्या नारायण राणे यांनी संभाजीराजेंवर तोफ डागली. त्यांच्या या धाडसाला कुणाचा पाठिंबा होता, याची चर्चा पक्षात सुरू झाली. या सर्व पार्श्वभूमीवर गेले काही महिने संभाजीराजे भाजपवर नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या खासदारपदाची मुदत पुढील वर्षी संपत आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यांना भाजप पुन्हा कुठे संधी देईल याची शक्यता दिसत नाही. यामुळे त्यांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल याबाबत आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचे सुतोवाच केले होते, त्यामुळे नवीन पक्ष की याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
लोकसभेचे उमेदवार होणार का?
माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने २०२४ चे ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील या पक्षाचे उमेदवार असणार आहेत. महाविकास आघाडी स्वतंत्र लढल्यास प्रा. संजय मंडलिक हे शिवसेनेच्या वतीने मैदानात उतरतील. अशावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन. पाटील यांच्यासह संभाजीराजेंचा पर्याय पुढे येऊ शकेल. सर्वमान्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येण्यास फारशा अडचणी येतील असे वाटत नाही. शिवाय मालोजीराजेंनी शहरातून पुन्हा एकदा विधानसभा लढविण्याची तयारी सुरू केली आहेच. तोच धागा पकडून सध्या महाविकास आघाडीकडे या घराण्याची वाटचाल सुरू असल्याचे समजते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times